मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपणारे ‘मैत्री क्लिनिक ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:43 IST2018-12-31T21:42:56+5:302018-12-31T21:43:14+5:30
किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांचे निराकरण जिल्ह्यातील ३२ मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून होत आहे. एक प्रकारे मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपले जात आहे.

मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपणारे ‘मैत्री क्लिनिक ’
औरंगाबाद : किशोरवयीन मुला-मुलींना वाढत्या वयात शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदलासंदर्भात अनेक प्रश्न भेडसावतात. या प्रश्नांवर आजही आई-वडील, शिक्षक अथवा अन्य कोणाशी मनमोकळेपणाने बोलले जात नाही. किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांचे निराकरण जिल्ह्यातील ३२ मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून होत आहे. एक प्रकारे मावळणारे बालपण अन् खुणावणारे तारुण्यपण जपले जात आहे.
१० ते १९ वर्षे वयोगट हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या काळात मुला-मुलींच्या अडचणी व समस्यांची जाणीव होऊन त्यांची समाधानकारक उत्तरे मिळणे गरजेचे असते. त्यातून त्यांच्या भावी जीवनावर सकारात्मक परिणाम घडण्यास मदत होते. याच उद्देशाने आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी मैत्री क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
याठिकाणी कार्यरत समुपदेशकांच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार केले जातात. किशोरवयीन मुला-मुलींनी समजण्याची जबाबदार मैत्री क्लिनिकमधून पार पाडली जाते. शारिरीक, मानसिक, भावनिक बदल घडून येताना मुले-मुली अनेकदा बावरून जातात किंवा बैचेन होतात. यावेळी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास त्यांची उत्सुकता असते. अनेकदा गैरसमज असतात. ही उत्सुकता आणि गैरसमज दूर करण्याचे व शास्त्रीय पद्धतीने माहिती देण्याचे काम मैत्री क्लिनिकमार्फत केले जात आहे.
जिल्ह्यातील ५ हजार ७५२ किशोरवयीन मुला-मुलींना यावर्षी समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मुलींची संख्या सर्वाधिक म्हणजे ३ हजार एवढी आहे. क्लिनिक, शाळा, महाविद्यालयांसह तरुण मंडळे आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊनही समुपदेशकांकडून मार्गदर्शन केले जात आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आरोग्य व आहारविषयक माहिती, ताणतणाव, समुपदेशन व सल्ला, विवाहपूर्व मार्गदर्शन, कुटुंबनियोजन साधने आदींविषयी समुपदेशन केले जात आहे.
चांगला कार्यक्रम
मैत्री क्लिनिक हा आरोग्य विभागाचा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. याद्वारे किशोरवयीन मुला-मुलींच्या व्यक्तिगत, वयात येताना निर्माण होणारे प्रश्न, अडचणी आदींचे निराकरण केले जात आहे.
-डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
जिल्हा रुग्णालयातही क्लिनिक
मैत्री क्लिनिकमध्ये किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन केले जाते. याठिकाणी पुस्तकेदेखील असतात. त्याचाही लाभ होतो. जिल्हा सामान्य रुग्णालयातही मैत्री क्लिनिक सुरू केले जाणार आहे.
-डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक