भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १ कोटीची फसवणूक; विघ्नहर क्रेडिट सोसायटीतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:15 IST2025-12-15T13:13:36+5:302025-12-15T13:15:02+5:30
जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १ कोटीची फसवणूक; विघ्नहर क्रेडिट सोसायटीतील प्रकार
छत्रपती संभाजीनगर : विघ्नहर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये एक वर्षासाठी ठेवी ठेवल्यास त्यावर १० ते १२ टक्केपर्यंत व्याज मिळते, असे सांगून एकास १ कोटी ५ हजार ५०० रुपये बचत खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्यातील ९३ लाख ५ हजार ५०० रुपये मुदत ठेव म्हणून गुंतवणूक केली. मात्र, मुदतीपूर्वी पैशाची गरज पडल्यामुळे पैसे परत घेण्यास क्रेडिट सोसायटीत गेल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यातून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये क्रेडिट सोसायटीचे संचालक डॉ. क्याटमवार, विरसिंहजी, आर.जी. बाहेती (सर्व रा. वसमत, जि. हिंगोली) यांच्यासह मृत अध्यक्ष तथा प्रमुख सल्लागार मथुरादास देशमुख (रा. बीड बायपास) यांचा समावेश आहे. फिर्यादी शेख तौफीक मोहमंद शफी (रा. टाईम्स कॉलनी, कटकट गेट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते लाकडापासून भुसा बनविण्याचा व्यवसाय करतात. सोसायटीचे मुख्य सल्लागार तथा अध्यक्ष मथुरादास देशमुख यांची कामानिमित्त भेट झाल्यानंतर त्यांनी सोसायटीमध्ये एक वर्षासाठी ठेवी ठेवल्यास त्यावर १० ते १२ टक्केपर्यंत व्याजाचा परतावा मिळतो. त्यासाठी बचत खाते उघडण्याची विनंती केली. त्यानुसार बचत खाते उघडले.
त्यात पाच टप्प्यात १ कोटी ५ हजार ५०० रुपये जमा केले. ९१ दिवसांसाठी ९३ लाख ५ हजार ५०० रुपये गुंतविल्यानंतर २ लाख ८ हजार ८०० रुपये व्याज मिळेल असे सांगितले. या आमिषाला बळी पडून १ एप्रिल २०२५ रोजी ९३ लाख ५ हजार ५०० रुपये मुदत ठेव म्हणून पैसे गुंतवले. ही ठेव १ जुलै रोजी पूर्ण होणार होती. त्यापूर्वीच फिर्यादीला पैशाची आवश्यकता पडल्याने ते शाखेत गेले. तेव्हा शाखा व्यवस्थापकाने मुख्य सल्लागार व अध्यक्ष असलेले देशमुख यांना कर्करोग झालेला असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी वारंवार शाखेत गेले. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. देशमुख यांना वारंवार संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. फिर्यादीसह इतरही ठेवीदारांचे पैसे परत मिळाले नसल्याचेही दरम्यानच्या काळात समाेर आले. तेव्हा क्रेडिट सोसायटीच्या तीन संचालकांशी संपर्क साधला. त्यांनीही टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अन् शाखाच बंद झाली
क्रेडिट सोसायटीचे मुख्य सल्लागार व अध्यक्ष मथुरादास देशमुख यांचे २६ जून २०२५ रोजी निधन झाले. मात्र, संबंधित शाखाच एक दिवस बंद झाल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादीने आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्याठिकाणी तक्रार नोंदविल्यानंतर प्राथमिक तपास झाला. गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.