फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:05 IST2025-10-28T17:01:51+5:302025-10-28T17:05:13+5:30
मुख्य सूत्रधार गुजरातनंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून चालवत होता फसवणुकीचा धंदा

फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
छत्रपती संभाजीनगर: शहरातील चिखलठाणा एमआयडीसी परिसरात पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते. पोलिसांनी या केंद्रातून ९२ मुले आणि २४ मुलींसह एकूण ११६ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 'गिफ्ट व्हाऊचर'चे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बोगस कॉल सेंटर गेल्या एक वर्षापासून अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू होते. इमारतीच्या आतमध्ये पडदे लावून, रात्री साडेसहा वाजल्यापासून सकाळपर्यंत कामाचे स्वरूप असायचे. विशेष म्हणजे, या कॉल सेंटरचे कर्मचारी 'हाय प्रोफाइल' गाड्यांमधून आत येत असत, ज्यामुळे परिसरातील लोकांना संशयही आला नाही. गुजरातमध्ये सुरू असलेले हे रॅकेट तेथील कारवाईनंतर अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहरात हलविण्यात आले होते.
११६ जणांना अटक
सोमवारी रात्री ११ वाजता दोन डिसीपी, १५ पेक्षा अधिक पीआय, पीएसआयसह १०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करून या इमारतीवर छापा टाकला. मंगळवारी दुपारी पाच वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण झाली. पोलिसांनी या केंद्रातून ९२ मुले आणि २४ मुलींसह एकूण ११६ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये बहुतांश तरुण हे ईशान्येकडील मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यांतील आहेत. सर्व आरोपींची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. सध्या पोलिसांनी सर्व संगणक, सर्व्हर आणि फसवणुकीसाठी वापरलेली कागदपत्रे ताब्यात घेतली असून, या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.