छत्रपती संभाजीनगरात सांभाळून करा पार्किंग; मनपाच्या ताफ्यात आले ६ टोइंग वाहने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:25 IST2025-12-10T19:25:03+5:302025-12-10T19:25:43+5:30
१ कोटी ५ लाख रुपये खर्च, खड्डे बुजविणाऱ्या दीड कोटीच्या वाहनाचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगरात सांभाळून करा पार्किंग; मनपाच्या ताफ्यात आले ६ टोइंग वाहने
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होते. महापालिकेने मागील काही दिवसांपासून चारचाकी वाहने जप्त करणे सुरू केले. जप्त केलेल्या वाहनधारकाकडून २ हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. ही कारवाई आणखी व्यापक करण्यासाठी प्रशासनाने १ कोटी ५ लाख रुपये खर्च करून पाच नवीन टोइंग वाहने खरेदी केली आहेत. त्यासोबतच मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचे अत्याधुनिक वाहन खरेदी केले. या वाहनांचे लोकार्पण प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
महापालिका स्मार्ट सिटी प्रशासनाच्या मदतीने पार्किंगचे धोरणही निश्चित करीत आहे. नवीन वर्षात ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या जागेशिवाय अन्य ठिकाणी वाहने उभी केल्यास ती मनपाकडून उचलण्यात येतील. त्यासाठी टोइंग वाहनांची गरज होती. यांत्रिकी विभागाने यासाठी निविदा प्रसिद्ध करून प्रत्येकी २१ लाख रुपयांची ५ टोइंग वाहने खरेदी केली. याची एकूण किमत १ कोटी ५ लाख रुपये असल्याचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सांगितले. या वाहनांचे लोर्कापण स्मार्ट सिटी कार्यालयासमोर प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, बाळासाहेब शिरसाट, यांत्रिकी विभागाचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
खड्डे बुजविणारे मशीन
शहरात खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेला अधून-मधून छोट्या निविदा काढाव्या लागत होत्या. खड्डे बुजविण्यासाठी पॉट होल मशीन खरेदी करण्यात आले. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे थंड डांबराच्या साह्याने खडी मिक्स करून कितीही मोठा खड्डा बुजविता येतो. अहमदाबाद आणि सुरत येथे मशीन यशस्वीपणे सुरू असल्याचे प्रात्यक्षिक पाहून मनपाने खरेदी केली. मशीन कंपनीचे अधिकारी मनपा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर मशीन वापरायला सुरूवात होईल.