कंधारात चार टन मासळीची विक्री
By Admin | Updated: June 9, 2014 01:11 IST2014-06-09T00:25:51+5:302014-06-09T01:11:43+5:30
कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़

कंधारात चार टन मासळीची विक्री
कंधार : मृग नक्षत्राच्या दिवशी मासे खाण्याची मोठी परंपरा आहे़ राज्यासह परप्रांतातून आणलेली ४ टन मासळीची विक्री झाली़ हातोहात मासळी संपल्याने अनेकांचा हिरमोड झाला़ परंतु मिळणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते़ त्यातून लाखोंची उलाढाल झाल्याची बाब समोर आली आहे़
भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा मोठ्या नेटाने पाळल्या जातात़ शेतकऱ्यांचे अन् व्यापाऱ्यांचे चांगले मुहूर्त भिन्न असतात़ शेतकरी गुढी- पाडव्याला नवीन वर्ष मानतो़ आणि सालगडी याच दिवशी करारबद्ध केले जातात़ पेरणीपूर्व मशागतीला जोमात सुरुवात केली जाते़ आपली कामे आटोपून शेतकरी मृग पावसाची प्रतीक्षा करतो़ बी-बियाणे, रासायनिक खताची खरेदी करून आकाशाकडे डोळे लावतो़ पर्जन्यमान चांगले व्हावे, अशी अपेक्षा करत निसर्गाला साकडे घातले जातात़
मृग नक्षत्रापासून पावसाने योग्य हजेरी लावली तर पेरणी चांगली होते़ पिकांची योग्य वाढ होते़ शेती पिकांनी बहरली अन् पिकांचा उतारा चांगला येतो़ त्यात पिकाला योग्य भाव लागला की, शेतकऱ्यांची उन्नती होते़ यासाठी पावसाळा उत्तम राहणे बळीराजासह सर्वांच्याच हिताचे असते़ त्यासाठी निसर्गाला शेतकरी मृगनक्षत्रादिवशी पावसासाठी साकडे घालतो़ असा एक मतप्रवाह ग्रामीण भागात आजही रूढ आहे़
मृग नक्षत्राच्या दिवशी मासे सेवन केले की मनाजोगता पाऊस पावसाळ्यात पडतो़ त्यासाठी मोठी झुंबड खरेदीसाठी उडते़ मत्स्य व्यावसायिकांनी ८ जून रोजी नांदेड, बारूळ, पेठवडज, घागरदरा, जगतुंग समुद्र आदी ठिकाणाहून ४ टन मासे विक्रीसाठी आणले होते़ मासे कमी पडू नयेत म्हणून आंध्र प्रदेशातून ७० किलो मासे आणल्याचे समजले़ संकरीत व गावरान मासळीने मासळी बाजार गजबजला होता़ त्यात गावरान मासळी मरळ आणि वाबंटला प्रति किलो ३०० रुपये भाव होता़ बळव २६०, कतला १४०, रहू १४०, मिरगल १४०, कटरना २००, सुपरनस २६० रुपये प्रतिकिलो भाव होता़ तरीही अनेकांना मासे मिळाले नसल्याने हिरमोड झाला़ तरीही ४ टन मासळीवर हजारो जणांनी ताव मारला़ त्यातून लाखोंची उलाढाल झाली़ (वार्ताहर)
मृग नक्षत्रादिवशी मासे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते़ त्यासाठी विविध जातीची मासे विक्रीसाठी आणली जातात़ अपुरा मासळी व्यवसाय राहू नये, यासाठी नांदेड, म्हैसा येथून मासे आणले होते.
- शंकर गंदलवाड, राम गंदलवाड (मत्स्य व्यावसायिक)
मासळीत मेद, चरबी कमी प्रमाणात असल्याने आरोग्याला लाभदायक आहे़ त्यात प्रथिने व व ई जीवनसत्व आहे़ बलवर्धक आहे़ त्यामुळे सेवन करणे आरोग्यास चांगले असते़ - डॉ़राजेश गुट्टे, (आयुर्वेदाचार्य, कंधार)