नागसेनवनातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 18:09 IST2019-07-10T18:06:50+5:302019-07-10T18:09:12+5:30
‘पीईएस’च्या वर्धापन दिनी वृक्षारोपण

नागसेनवनातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे
औरंगाबाद : नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७४ वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून साजरा केला. यावेळी स्टुडंटस् वेल्फेअर असोसिएशन व माजी विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मिठाईचे वाटपही केले.
यावेळी बोलताना डॉ. प्रमोद दुथडे म्हणाले, पीईएस सोसायटीमुळेच आंबेडकरी चळवळीतील पहिली पिढी शिकली. हीच पिढी विविध क्षेत्रात नेतृत्व करीत आहे. पीईएसमुळे समाजाचा विकास झाला. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी जबाबदारी स्वीकारून संस्थेकडे पाठ न फिरविता विकासासाठी पुढे आले पाहिजे. संस्थेची होणारी दुरवस्था थांबविण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे, असेही त्यांनी सांगितले. मिलिंद महाविद्यालयाच्या १९७५ च्या बॅचचे विद्यार्थी तथा माजी नगरसेवक इकबालसिंग गिल म्हणाले, आणीबाणीच्या काळात आम्हाला कोठेही प्रवेश मिळत नसताना मिलिंद महाविद्यालयाने उच्चशिक्षण दिले. आज जे काही आहोत ते सर्व मिलिंद महाविद्यालयामुळेच असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर म्हणाले, पीईएस संस्था समाजाच्या उत्कर्षासाठी स्थापन केली. आता संस्थेची वाताहत होत आहे. त्यास समाजही जबाबदार आहे. मिलिंदच्या माध्यमातून एक जबाबदार नागरिक घडविण्यासह सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे केंद्र बाबासाहेबांना अपेक्षित होते. डॉ. भीमराव गवळी यांनी शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे रूपचंद गाडेकर, चंद्रकांत रुपेकर, संस्थेचे अध्यक्ष सचिन निकम, डॉ. अविनाश सोनवणे, अॅड. अतुल कांबळे, अविनाश कांबळे, रूपराव खंदारे, पवन पवार, मनोज शेजूळ, मयुरी गायकवाड, अॅड.अश्विन दांडगे, गुणरत्न सोनवणे, अविनाश जगधने, महेंद्र तांबे यांची उपस्थिती होती.
४० वृक्षांची लागवड
पीईएस संस्थेच्या परिसरात वर्धापन दिनानिमित्त पिंपळ, बॉटल पाम, करंज, अशोका, सप्तपर्णी, गुलमोहर, बदाम, डुरांटा, कॉर्डिया, जकरांडा, रेन ट्री, टगर असे विविध प्रकारच्या ४० वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संवर्धनासाठी ट्री गार्डही लावण्यात आले. वृक्षारोपणासाठी विविध व्यक्तींनी वृक्ष उपलब्ध करून दिले.