इमारतीतील बीयर शॉपीला देशी दारू विक्रीचा परवाना; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:43 IST2025-01-22T12:42:45+5:302025-01-22T12:43:55+5:30
संतप्त रहिवाशांनी इमारतीमध्ये दुकान आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून धाव

इमारतीतील बीयर शॉपीला देशी दारू विक्रीचा परवाना; रहिवासी संतप्त, आंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : बीअर शॉपीचा परवाना असलेल्या दुकानाला परस्पर देशी दारु विक्रीचा परवाना देण्यात आला. याच इमारतीत पहिले संगणक क्लासेस, नर्सिंग महाविद्यालय आहे. रहिवासी इमारतीत उत्पादन शुल्काने परस्पर हा प्रकार केल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाहेगुरू फ्लॅट ॲण्ड शॉप ओनर्स को-आपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व रहिवासी मंगळवारी दुपारी २:०० वाजता या देशी दारुच्या दुकानाविरोधात रस्त्यावर उतरले होते. गजानन महाराज मंदिर पुंडलिकनगर रस्त्यावरील इमारतीत मीताक्षी बीअर ॲण्ड वाइन शॉपी आहे. या जागी आता देशी दारु परवाना स्थलांतर करून विक्री व सेवन सुरू करण्याचा प्रयत्न आहे. स्थलांतर परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांनी जागेची पाहणी केली नाही. सोसायटी सदस्यांनाही कळवण्यात आले नाही. मंगळवारी रहिवासी रस्त्यावर उतरताच उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी, पुनम चव्हाण, रेणुका कांबळे यांनी धाव घेत त्यांचा आक्षेप ऐकून घेत जबाब नोंदवले.
...का आहे विरोध ?
-इमारतीत शासनमान्य एक नर्सिंग महाविद्यालय, एमएससीआयटी, संगणक क्लास.
-दुकानाला पार्किंग व्यवस्था नाही. मद्यपी तेथे दारु पिऊन तेथेच लघुशंका करणे, महिलांची छेड काढण्याच्या घटनांची दाट शक्यता.
-दुकानापासून हाकेच्या अंतरावर स्वामी समर्थ, गजानन महाराज मंदिर, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर शाळा.
-या विद्यार्थ्यांना देशी दारु दुकानाचा मोठा त्रास होणार.
वरिष्ठांना अहवाल पाठवणार
नागरिकांचा विरोध लक्षात घेता त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. मद्य विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मतदान प्रक्रिया घ्यावी लागते. त्याबाबत नागरिकांना अवगत केले आहे.
- आनंद चौधरी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग