वन विभागाची टोळी सक्रिय
By Admin | Updated: May 10, 2014 19:09 IST2014-05-10T16:50:56+5:302014-05-10T19:09:55+5:30
वन विभागाचे बोगस नियुक्तीपत्र

वन विभागाची टोळी सक्रिय
वन विभागाचे बोगस नियुक्तीपत्र
सावधान : आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रिय
अशोक कारके
औरंगाबाद : भारतीय वन विभागात क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्याचे पत्र शहरातील १० ते १२ तरुणांना नवी दिल्ली येथून आले आहे़ प्रशिक्षणादरम्यान सुरक्षा रक्कम म्हणून बँक खात्यावर १३ हजार ३०० रुपये जमा करा, असे सांगून नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे़
विशेष म्हणजे भारतीय वन विभागाच्या नावाने कोणताही अर्ज न भरलेल्या तरुणांना असे बनावट नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. तरुणांना गंडविण्यासाठी उमेदवाराची निवड फक्त फोनद्वारे केली जाईल, अशी सूचना पत्रात देण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्यानंतर २५ हजार ५०० रुपये महिना पगार, राहण्यासाठी घर, चारचाकी वाहन व त्यावर चालक, ५ लाखाचा भारत सरकारद्वारा विमा, वर्षाला १० टक्के वेतनवाढ, वन मंत्रालयाकडून व्हीआयपी नंबर, महिन्यात तीन वेळा विमान प्रवासाची संधी, असे आमिष दाखविण्यात आले आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आशिषकुमार या नावाने असणार्या ३३७२५५०४८६३ या क्रमांकाच्या खात्यावर १३ हजार ३०० रुपये जमा करण्यास सांगितले आहे. यानंतर विभागाचा अधिकारी येऊन उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करून दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र व व्ही़ आय़ पी़ बॅच नंबर देईल़ उमेदवाराने पैसे भरल्यानंतर दोन दिवस प्रतीक्षा करावी, असे सुचविले आहे़
या नियुक्तीपत्रामुळे तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नियुक्तीपत्र कुणी पाठविले याचा ठावठिकाणा लागत नाही.
ना परीक्षा ना मुलाखत
उमेदवाराची कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात आलेली नाही़ यापैकी काहींनी वन विभागाचा कोणताही अर्ज भरलेला नाही़, तरीही या तरुणांना नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. युवराज दादाराव पदार या तरुणाला ५ मे रोजी पत्र मिळाले आहे़ त्याने वन विभागाला संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने लोेकमत प्रतिनिधीशी संपर्क साधला़