सुदृढ आरोग्यासाठी क्षमता ओळखूनच करा व्यायाम, अति व्यायामाचे धोके काय?
By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 29, 2024 17:45 IST2024-02-29T17:44:56+5:302024-02-29T17:45:10+5:30
कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे वाईट परिणामही जाणवतात. अति व्यायाम करणेही धोकादायक ठरू शकते.

सुदृढ आरोग्यासाठी क्षमता ओळखूनच करा व्यायाम, अति व्यायामाचे धोके काय?
छत्रपती संभाजीनगर : निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनानंतरच्या काळात तर जीममध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कारण, सर्वजण आरोग्याच्या प्रति जागरूक झाले आहेत. पण, व्यायाम करताना अति उतावळेपणा टाळा. कारण, ‘अति तिथे माती’ असे म्हटले जाते. कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे वाईट परिणामही जाणवतात. अति व्यायाम करणेही धोकादायक ठरू शकते.
व्यायाम करण्याआधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक
व्यायाम सुरू करण्याआधी फिटनेस ट्रेनर किंवा तज्ज्ञांशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्या चर्चेतून ‘वर्कआऊट प्लॅन’ तयार केला जातो. त्यानुसारच स्टेप बाय स्टेप व्यायाम केला तरच त्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. लवकरात लवकर सुदृढ शरीर करण्याच्या नादात दुसरी स्टेप सोडून थेट सहावी स्टेप करण्यास सुरुवात कराल तर ते घातक ठरू शकते. अशी अनेक उदाहरणे जीममध्ये पाहण्यास मिळतात.
व्यायाम शरीरासाठी फायदेशीर
दररोज व्यायाम केल्याने शरीराचे संतुलन टिकून राहते. दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम फायदेशीर होतो. चालणे हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे. व्यायाम केल्याने शरीरातील घाम निघून जातो. व्यक्ती ताजी-तवानी होते. पहाटे किंवा सकाळच्या वेळी व्यायाम करणे सर्वाेत्तम मानले जाते.
अति व्यायामाचे धोके काय ?
१) स्नायूंमध्ये वेदना होणे : व्यायाम केल्यानंतर शरीरातील स्नायू दुखू लागतात. विशेषत: पहिल्यांदा व्यायाम करीत असलेल्यांना असा त्रास जास्त जाणवतो. तसेच अति व्यायाम केल्यानेही स्नायूंमध्ये वेदना होतात.
२) दमल्या-थकल्यासारखे वाटणे : जास्त व्यायाम केल्यावर दमल्या-थकल्यासारखे, गळून गेल्यासारखी अवस्था होणे.
३) निद्रानाशाची समस्या : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्यास शरीराला आराम मिळतो तसेच रात्री झोपही चांगली येते. पण, अति व्यायाम केल्याने स्नायू दुखू लागतात व त्यामुळे झोपही येत नाही.
क्षमता ओळखून व्यायाम करा
तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा शरीराची हालचाल वेगाने होते. जर अति व्यायाम केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. जास्त ऊर्जा संपते व नंतर थकवा जाणवू लागतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अनेकदा गंभीर आजार उद्भवू शकतात.
- फिटनेस ट्रेनर