पुरामुळे सात तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:15 IST2017-08-30T00:15:48+5:302017-08-30T00:15:48+5:30
सोमवारी जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका परभणी आणि सेलू तालुक्याला बसला आहे. परभणी तालुक्यातील तीन गावातील शेतात दुधना नदीचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. तर सेलू तालुक्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्याने सेलू- पाथरी या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प झाली होती.

पुरामुळे सात तास वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सोमवारी जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका परभणी आणि सेलू तालुक्याला बसला आहे. परभणी तालुक्यातील तीन गावातील शेतात दुधना नदीचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. तर सेलू तालुक्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्याने सेलू- पाथरी या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प झाली होती.
जिल्हाभरात दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे दुधना, पूर्णा, गोदावरी या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. तर कसुरा नदीला पूर आला. या पुरामुळे सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील दळण-वळणावर परिणाम झाला. सेलू- पाथरी या मार्गाबरोबरच वालूर आणि शिंदे टाकळी मार्गावरील पुलाच्या वरुन पाणी वाहत असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कसुरा नदीला पूर आला. वाहतूक ठप्प झाल्याने सेलू- पाथरी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी ३ वाजता पाणी ओसरले. त्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. देऊळगाव- आष्टी या मार्गावर देऊळगाव जवळ ओढ्याला पूर आल्याने डासाळा-आष्टी मार्ग उशिरापर्यंत बंद होता. रवळगाव- शिंदे टाकळी मार्गावर बोरगाव जवळील ओढ्याला पूर आल्याने आहेर बोरगाव, सिद्ध बोरगाव, मालेटाकळी, शिंदे टाकळी या गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. सेलू- वालूर रस्त्यावरील राजवाडी येथे दुधना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वालूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.