पाच वर्षांनी आली भाजपाला जाग
By Admin | Updated: December 21, 2014 00:18 IST2014-12-21T00:07:51+5:302014-12-21T00:18:14+5:30
औरंगाबाद : महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना सुमारे पावणेपाच वर्षांनंतर आज पहिल्यांदा जाग आली.

पाच वर्षांनी आली भाजपाला जाग
औरंगाबाद : महापालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना सुमारे पावणेपाच वर्षांनंतर आज पहिल्यांदा जाग आली. सत्तेच्या विरोधात भाजपा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठिय्या दिला. समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीकडून देण्यात येणारी बोगस बिले, रस्त्यांची व वॉर्डातील रखडलेल्या विकासकामांवरून भाजपा नगरसेवकांनी एक तास सभागृहात बैठे आंदोलन केले. शिवसेनेला आगामी काळात शह देण्याच्या दृष्टीने ही रणनीती आखण्यात आली होती.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी आणि प्रशासनाच्या विरोधात भाजपा नगरसेवकांनी घोषणा दिल्या. यावरून सेना-भाजपा नगरसेवकांत शाब्दिक वाद झाले.
सभेच्या सुरुवातीलाच गटनेते संजय केणेकर, महेश माळवतकर, संजय चौधरी, बबन नरवडे, बालाजी मुंडे, साधना सुरडकर, ऊर्मिला चित्ते, कमल नरोटे, हुशारसिंग चौहान, राजू शिंदे यांनी पाणीपट्टीची बिले आणि रस्त्यांच्या कामांवरून महापौरांसमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. उपमहापौर संजय जोशी डायसवरून खाली उतरले. त्यांनी नगरसेवकांना समजावले. त्यानंतर राजू वैद्य, गजानन बारवाल यांनीही समजावले; परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
भाजपाच्या ठिय्या आंदोलनात अफसर खान, मिलिंद दाभाडे यांनीही उडी घेतली. महापौर कला ओझा यांनी वैतागून सभा तहकूब केली.