तरुणांना गंडविणारे पाच भामटे गजाआड
By Admin | Updated: September 16, 2014 01:36 IST2014-09-16T01:20:42+5:302014-09-16T01:36:47+5:30
औरंगाबाद : विमानतळावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविणाऱ्या टोळीतील पाच भामट्यांना क्रांतीचौक पोलिसांनी काल अटक केली.

तरुणांना गंडविणारे पाच भामटे गजाआड
औरंगाबाद : विमानतळावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविणाऱ्या टोळीतील पाच भामट्यांना क्रांतीचौक पोलिसांनी काल अटक केली.
आरोपींमध्ये राहुल गोविंद राठोड (रा. काजळी हिंगणा, नागपूर), वीरेंद्रसिंह बियानसिंह (३८, रा. बजानकला, सोनिपत, हरियाणा), सुमितकुमार श्रीपितांबर भट (२३, रा. फुटसील, उत्तराखंड), कपिल शिवकुमार गौतम (२२, रा. दिल्ली) व कृष्णधर रणजित मिश्रा (२३, रा. गांधीनगर, वर्धा) यांचा समावेश आहे. या आरोपींना न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईबाबत फौजदार सिद्दीकी यांनी सांगितले की, विमानतळावर कस्टमर सपोर्ट, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हाऊस कीपिंग व सिक्युरिटी गार्डसाठी भरती करणे आहे, अशा आशयाची या आरोपींनी विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. या आरोपींनी आपल्या भरती कंपनीचे निराला बाजारमध्ये कार्यालयही उघडले होते.
ही जाहिरात वाचून हुसैन कॉलनीतील सत्तार सलीम शहा या बेरोजगाराने संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्याला आपल्या कार्यालयात बोलविले. तो कार्यालयात गेल्यानंतर आरोपींनी त्याला विमानतळावर एक्झिक्युटिव्ह पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून त्याच्याकडून कागदपत्र जमा करून घेतले आणि साडेतीन हजार रुपयांची मागणी केली.
पैसे देतो, असे सांगून शहाने विमानतळावर जाऊन चौकशी केली. तेव्हा अशी कुठलीही भरती सुरू नसल्याचे त्याला समजले. तेव्हा काही तरी गडबड असल्याने शहा याच्या लक्षात आले. त्याने पुन्हा निराला बाजारमध्ये जाऊन आरोपींकडे विचारपूस केली. त्यावेळी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा ही भामटेगिरी असल्याचे स्पष्ट झाले. लगेच शहाने क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुकीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी वरील पाचही आरोपींना अटक केली.