अपघातातील मृत्युसंख्या खुनाच्या पाचपट...!
By Admin | Updated: January 12, 2016 00:05 IST2016-01-11T23:55:42+5:302016-01-12T00:05:25+5:30
औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये

अपघातातील मृत्युसंख्या खुनाच्या पाचपट...!
औरंगाबाद : शहरात जेवढे खून होतात, त्याच्या पाचपट लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. गतवर्षी ३२ जणांचा खून झाला, तर त्याच वेळी रस्ते अपघातांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. त्यामुळे अधिक काळजी घेऊन वाहन चालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते उद््घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड, एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र सावंत, दिलीप उकि र्डे, मनीष धूत, औरंगाबाद गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान, सेवानिवृत्त अधिकारी अशोक गिरी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, शहरातील वाहतुकीची स्थिती चांगली नाही. त्यामुळे २०१६ या वर्षात काही उद्देश ठेवून कृती करण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनी हेल्मेट सक्ती करण्याची गरज आहे. नियम मोडणाऱ्यांना दोन तास प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
या वर्षाच्या अखेरपर्यंत ९९ टक्के लोक हेल्मेट वापरतील. जे एक टक्का लोक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांना आमच्या पद्धतीने कायद्याचा धडा शिकविण्यात येईल, असे अमितेशकुमार म्हणाले. १६ हजारांवर संख्या असलेल्या रिक्षांना शिस्त लागली तरच वाहतुकीत सुधारणा होईल; परंतु त्यासाठी प्रयत्न केला तर काहींचा विरोध होतो. रिक्षाचालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अन्यथा कारवाई होईल, असे अमितेशकुमार म्हणाले.
...तर ८० टक्के वाहतूक समस्या संपेल
लोकांचे सहकार्य,स्वत:हून नियमांचे पालन आणि आपल्या कु टुंबियांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ देणार नाही हे तीन संकल्प प्रत्येकाने केले तरच वाहतुकीमध्ये सुधारणा होईल. आॅटोरिक्षांनी शिस्त दाखविली, प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर केला आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे बंद झाले तर शहरातील ८० टक्के वाहतूक समस्या संपेल. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रत्यक्ष कृतीनेच २०१६ या वर्षात वाहतुकीत सुधारणा होईल, असेही अमितेशकुमार म्हणाले.