औरंगाबादच्या उपमहापौरांसह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:33 IST2018-08-21T00:31:48+5:302018-08-21T00:33:23+5:30
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केल्यावरून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी सिटीचौक पोलिसांनी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक केली.

औरंगाबादच्या उपमहापौरांसह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केल्यावरून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी सिटीचौक पोलिसांनी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक केली.
आरोपी नगरसेवकांमध्ये भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, रामेश्वर भादवे आणि नगरसेविका माधुरी अदवंत यांचा समावेश आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर १७ आॅगस्ट रोजी सर्वसाधारण सभेत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन हे उभे राहिले आणि त्यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे चिडलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी मतीन यांना सभागृहात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी मतीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच नगरसेवकांविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
मतीनला अटक झाल्यानंतर भाजप नगरसेवकांना कधी अटक करणार, असा सवाल पोलिसांना विचारला जाऊ लागला होता. त्यामुळे सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे, उपनिरीक्षक सतीश पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी पाचही नगरसेवकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. औताडे यांना त्यांच्या वॉर्डातील संपर्क कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
‘त्या’ नगरसेवकांची जामिनावर सुटका
नगरसेवक मतीन यांना मारहाण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास उपमहापौरांसह पाच नगरसेवकांना अटक करून ठाण्यात नेले. तेथे त्यांची तपासकामी चौकशी केल्यानंतर रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास जामिनावर सुटका केली. पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे म्हणाले की, हा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना जामीन देण्यात आला.
मतीन पोलीस कोठडीत
उपमहापौर औताडे आणि बाळू खंदारे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात नगरसेवक मतीन यांच्याविरोधात दोन समाजात द्वेष निर्माण करणे, चिथावणी देऊन जमावाला वाहनांची तोडफोड करण्यास लावल्याचा आरोप असलेले दोन वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे आणि दंगल करण्यासह अन्य कलमानुसार बेगमपुरा ठाण्यात मतीन आणि जावेद कुरेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तोडफोडीच्या गुन्ह्यात मतीन हे सिटीचौक पोलिसांच्या कोठडीत आहेत.