फिटे ‘ना’ अंधाराचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:53 IST2017-12-22T22:52:28+5:302017-12-22T22:53:38+5:30

संकटांवर संकटे झेलता झेलता मेटाकुटीस आलेल्या बळीराजाची आता महावितरण कंपनीनेही साथ सोडल्याने शेतवस्त्या ओस पडू लागल्या आहेत. जिच्या साथीने शेतवस्त्यांचे वैभव वाढते, ती वीजच धोका देऊ लागल्याने शेतक-यांसह गुरा-ढोरांना अंधाराचा सामना करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी आपल्या पशुधनासह गावचा रस्ता धरला आहे.

 Fite 'no' darkness of darkness | फिटे ‘ना’ अंधाराचे जाळे

फिटे ‘ना’ अंधाराचे जाळे

शेतवस्त्या ओस : थकबाकीमुळे महावितरणने कापली वीज; पशुधनासह शेतक-यांनी धरला गावचा रस्ता
फुलंब्री : रऊफ शेख
संकटांवर संकटे झेलता झेलता मेटाकुटीस आलेल्या बळीराजाची आता महावितरण कंपनीनेही साथ सोडल्याने शेतवस्त्या ओस पडू लागल्या आहेत. जिच्या साथीने शेतवस्त्यांचे वैभव वाढते, ती वीजच धोका देऊ लागल्याने शेतक-यांसह गुरा-ढोरांना अंधाराचा सामना करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी आपल्या पशुधनासह गावचा रस्ता धरला आहे.
तालुक्यातील शेतकºयांकडे एक कोटी रुपये थकल्याने बारा हजार कृषी पंपांची वीज महावितरणने कापल्याने शेतात राहणाºया शेतकºयांची मोठी फजिती झाली आहे. घरात अंधार असून जनावरांसाठी पिण्याचे पाणी विहिरीतून पोहºयाने काढावे लागत आहे. दररोजच्या या कटकटीला वैतागून या वस्त्यांवरील शेतकरी कुटुंबे गावात येत आहेत.
फुलंब्री तालुक्यात सतरा हजार शेतकºयांकडे कृषीपंप असून त्यांच्याकडे महावितरणचे एक कोटी ४० लाख रुपये थकले होते. बिले वसूल होत नसल्याने महावितरणने सुमारे बारा हजार शेतकºयांचा वीजपुरवठा खंडित केला. यातील केवळ १८४३ शेतकºयांनी आपल्याकडील थकबाकी भरली. बाकीच्या शेतकºयांकडे बिले भरण्याइतके पैसे नाहीत, असे चित्र सध्या तालुक्यात आहे. कारण खरीप हंगामातील कपाशीची बोंडअळीने वाट लावल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. रबी हंगाम आला पण खिशात पैसे नाही, त्यात आहे त्या पाण्यावर लागवड करायची तर वीज नाही, अशा दृष्टचक्रात बळीराजा सापडला आहे. त्यामुळे यंदाचा रबी हंगाम गेल्यात जमा आहे.
४० टक्के शेतवस्ता
तालुक्यातील ४० टक्के शेतकरी शेतीची मशागत चांगल्या प्रकारे व्हावी, शेतीमालाची देखभाल करता यावी, यासाठी गाव सोडून शेतात वस्ती करून राहतात. सोबत पशूपालनही असते. तेथे पिण्याचे पाणी विहिरीतूनच उपलब्ध होते. यंदा पावसाळ्यात फारसा पाऊस पडला नाही, पण थोडेफार पाणी विहिरीत आहे. हे पाणी दररोज शेतकºयांना व गुराढोरांना लागते. पण ते काढण्यासाठी वीज उपलब्ध नाही, परिणामी शेतकºयाला पुन्हा जुन्या पारंपरिक पद्धतीने पोहºयाचा वापर करून पिण्याचे पाणी काढावे लागत आहे.
दुष्काळात तेरावा महिना...
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. कपाशी पिक गेले, रबीची हमी नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी सापडला असताना त्यांना पुन्हा महावितरण कंपनीने झटका दिला. अशा परिस्थितीत शेतकºयांना शेतात थांबता येत नसल्याने ते बारदाना घेऊन गावात येत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास काही दिवसात वाड्या- वस्त्या ओस पडण्याची भिती निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीच्या निर्णयाने शेतकºयांच्या नशिबी दुष्काळात तेरावा महिना आला आहे.
विद्युत पंपांची बिले गेल्या अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली. कंपनी चालविण्यासाठी महावितरणलाही पैसे हवे आहेत. महावितरणची भूमिका बरोबर असली तरी सध्यस्थितीचा विचार करुन शासनानेच यावर तोडगा काढला पाहिजे, तरच शेतकरी व महावितरण कंपनीचे समाधान होऊ शकेल.



 

Web Title:  Fite 'no' darkness of darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.