आधी दगडफेक, नंतर चाकू काढला; कुख्यात मारेकऱ्याच्या भावाचा पोलिसांवर हल्ला

By सुमित डोळे | Published: December 27, 2023 08:14 PM2023-12-27T20:14:21+5:302023-12-27T20:14:32+5:30

मोबाइलचे दुकान फोडून देत होता पोलिसांना चकवा

First stoned, then knife drawn; Notorious killer's brother attacks police | आधी दगडफेक, नंतर चाकू काढला; कुख्यात मारेकऱ्याच्या भावाचा पोलिसांवर हल्ला

आधी दगडफेक, नंतर चाकू काढला; कुख्यात मारेकऱ्याच्या भावाचा पोलिसांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर : मोबाइलच्या दुकानात चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेला कुख्यात गुन्हेगार शेख वाहेद शेख मोहसीन (२०, रा. सईदा कॉलनी, जटवाडा) याने सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकावर चाकू, दगडाने हल्ला केला. पोलिसांनी वार चुकवून त्याच्या मुसक्या आवळल्या. खून करून मांस खाण्यासाठी कुख्यात असलेला मारेकरी बबल्याचा तो लहान भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टीव्ही सेंटर परिसरात महिनाभरापूर्वी मोबाइलचे दुकान फोडून २० पेक्षा अधिक मोबाइल चोरीला गेले होते. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहेद साथीदारासह कैद झाला होता. सोमवारी तो हर्सूल तलावाजवळ फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक विनायक शेळके, अंमलदार संजय राजपूत, विलास मुठे, रामदास गव्हाणे त्याला पकडण्यासाठी दुपारी १२ वाजता रवाना झाले. शेळके, राजपूत यांनी रिक्षातून साध्या वेशात त्याचा पाठलाग सुरू केला, तर मुठे, गव्हाणे दुसऱ्या बाजूने त्याला हेरण्याच्या तयारीत होते. ओढा ओलांडताच रिक्षा वाहेदच्या जवळ गेली व त्याला संशय आला. तत्काळ धूम ठोकत तो हनुमाननगरमध्ये पळाला. पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला.

आधी दगडफेक, नंतर चाकू काढला 
वाहेदने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून पथकाच्या दिशेने विटांचा मारा केला. नंतर घरावर लपून बसला. कर्मचारी जवळच जाताच त्याने चाकू काढून त्यांच्यावर वार केले. यात कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतरही तो पोलिसांना क्रूर मारेकरी भावाच्या नावाने धमकावत होता. पोलिसांनी मात्र त्याला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवत बेगमपुरा ठाण्यात नेले. त्याच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप करणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत. उपनिरीक्षक शेख हारून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: First stoned, then knife drawn; Notorious killer's brother attacks police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.