आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 8, 2025 18:50 IST2025-03-08T18:27:01+5:302025-03-08T18:50:07+5:30

स्त्रियांना पुरोहित बनविण्याचे व्रत; महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर त्यानंतर, नाशिक, ठाणे, पुणे व १४ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात ‘पौरोहित वर्ग’ सुरू झाले.

First she became a Purohit herself, then in 14 years she trained 500 women to become Purohit | आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण

आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण

- प्रशांत सुमन तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर :
‘पुरोहित’ म्हटले की, तुमच्यासमोर डोक्यावर टोपी, नेहरू शर्ट, धोती, कपाळावर गंध लावलेला व्यक्ती समोर येतो. मात्र, आता या पौरोहित्यांच्या क्षेत्रातही महिलांनी पाऊल टाकले आहे. होय, एकट्या आपल्या छत्रपती संभाजीनगरात मागील १४ वर्षांत ५०० महिलांनी पौरोहित्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. महिलांना ‘पुरोहित’ बनविण्याचे व्रत शहरातीलच ज्येष्ठ पुरोहित सुजाता भावठाणकर यांनी घेतले आहे. आज वयाच्या ५८व्या वर्षीही त्यांचा खणखणीत आवाज, मंत्रोच्चाराचे स्पष्ट स्वर आणि त्याचा अर्थ समजून सांगतानाची रसाळ वाणीही वाखाणण्याजोगी ठरत आहे.

महिलांना पुरोहित बनविण्याचा उद्देश काय?
या संदर्भात सुजाता भावठाणकर यांनी सांगितले की, घरात केले जाणारे वर्षभराचे सर्व सणवार, कुलाचार स्त्रीला छान पद्धतीने करता यावेत, स:मंत्रक पूजा करता यावी, पुढील पिढीला त्याचा उत्तम वारसा देता यायला हवा, यासाठी महिलांना पौरोहित्य शिकवून संस्कृती संवर्धनाचा हा प्रयत्न आहे.

राष्ट्रसेविका समितीचा पुढाकार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांतर्गत राष्ट्रसेविका समितीचे कार्य चालते. या अंतर्गत पौरोहित्य एक शाखा आहे. या शाखेच्या वतीने महिलांसाठी ‘पौरोहित्य वर्ग’ घेतले जातात. यासाठी ५ वर्षांचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर त्यानंतर, नाशिक, ठाणे, पुणे व १४ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात ‘पौरोहित वर्ग’ सुरू झाले. एकट्या शहरातच मागील १४ वर्षांत ५०० महिलांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यात ४५ ते ८५ वयोगटांतील महिलांचा समावेश आहे.

लग्न, वास्तुशांती, सत्यनारायण पूजा
सुजाता भावठाणकर यांनी शहरात व पुण्यात ७ लग्नात पौरोहित्य केले आहे. अनेक सत्यनारायण पूजा, वास्तुशांती केल्या. ५० पेक्षा अधिक महिला पुरोहित मंगळागौरीची पूजा, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी लघू रुद्र, महारुद्राची आवर्तने, श्रीसुक्त पठण, सप्तशतीपाठ, अथर्वशीर्ष म्हणत असतात.

पौरोहित्य शिकण्यासाठी जातीचे बंधन नाही
भावठाणकर म्हणाल्या की, पौरोहित्य शिकण्यात ब्राह्मण महिलांची संख्या जास्त असते हे बरोबर आहे, पण राष्ट्रसेविका समितीकडून सर्व जातीच्या महिलांना शिकविले जाते. आम्ही शिकण्यासाठी येणाऱ्या महिलांना जात-धर्मही विचारत नाही, पण संस्कृत वाचता येणे आवश्यक आहे.

Web Title: First she became a Purohit herself, then in 14 years she trained 500 women to become Purohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.