आधी रेकी, मग मैत्रिणीसोबत मिळून सराफा दुकानांत चोरी; कोपरगाववरून बंटी-बबली अटकेत
By सुमित डोळे | Updated: November 8, 2023 17:20 IST2023-11-08T17:19:58+5:302023-11-08T17:20:03+5:30
शहराच्या सराफा बाजारातील एका दुकानातून ७ ग्रॅम सोन्याची चोरी करून दोघेही कोपरगावला पळून गेले होते.

आधी रेकी, मग मैत्रिणीसोबत मिळून सराफा दुकानांत चोरी; कोपरगाववरून बंटी-बबली अटकेत
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीसोबत दुचाकीवर फिरून सराफा बाजारात ग्राहक म्हणून जात चोरी करणाऱ्या राजू काशीनाथ चव्हाण (४८, रा. वडागळे वस्ती, कोपरगाव) व तारा काशिनाथ कुदळे (४०, रा. पोहेगाव ता. कोपरगाव ) यांना गुन्हे शाखेने अटक केली. शहराच्या सराफा बाजारातील एका दुकानातून ७ ग्रॅम सोन्याची चोरी करून दोघेही कोपरगावला पळून गेले होते.
१६ ऑक्टोबर रोजी संजय सावखेडकर ज्वेलर्स दुकानात काम करणारा इसम यश गिरी नेहमीप्रमाणे ग्राहकांना दागिने दाखवत होता. यावेळी निळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिलेने दुकानात जात सोन्याचे कानातले दाखवण्यासाठी सांगितले. गिरी दागिने दाखवत असताना महिलेने हातचलाखीने ट्रेमधून सोन्याचे ७ ग्रॅमचे कानातले जोड चोरले. दागिन्यांची मोजमाप सुरू असताना हा प्रकार लक्षात आला. गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानापासून काही अंतरावर चोरी करणारी महिला एका पुरुषासोबत दुचाकीवरून जाताना कैद झाली. खबऱ्यामार्फत तो राजू असल्याचे निष्पन्न होताच त्याचा शोध सुरू झाला. उपनिरीक्षक संदीप सोळंके यांनी पथकासह कोपरगावला जाऊन त्याला ताब्यात घेतले.
आधी रेकी, मग गर्दी असलेले दुकान हेरायचे
राजूने चौकशीत तारासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली. सराफा बाजारात फिरून ते आधी रेकी करतात. त्यानंतर गर्दी असलेल्या दुकानात ताराने ग्राहक बनून जात चोरी करायचे त्यांचे नियोजन होते. १६ ऑक्टोबर रोजी चोरी करून ते त्याच्याच दुचाकीवरून कोपरगावला निघून गेले. अंमलदार नवनाथ खांडेकर, ज्ञानेश्वर पवार, श्याम आढे, अनिता त्रिभुवन यांनी नंतर ताराला ताब्यात घेत चोरीचा ऐवज जप्त केला.