पहिला पाऊस चिमुकलीच्या जीवावर बेतला; गॅलरीतून पडून झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:03 IST2021-05-17T18:01:39+5:302021-05-17T18:03:16+5:30
रविवारी सायंकाळी ४ वाजता अचानक आलेला अवकाळी पाऊस चिमुकली गॅलरीत उभी राहून पाहत होती.

पहिला पाऊस चिमुकलीच्या जीवावर बेतला; गॅलरीतून पडून झाला मृत्यू
औरंगाबाद : पहिल्या पावसाचा आनंद लुटणाऱ्या साडेचार वर्षीय बालिकेचा गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना हर्सूल परिसरातील श्रेयसनगरात रविवारी सायंकाळी घडली. याविषयी हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
हर्षदा उर्फ राणी भगवान वाघ असे मृत बालिकेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार हर्षदाला घरातील सर्वजण लाडाने राणी म्हणायचे. तिचे वडील ट्रॅक्टरचालक आहेत. ते श्रेयसनगर येथे पहिल्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहतात. रविवारी सायंकाळी ४ वाजता अचानक अवकाळी पाऊस आला. यावेळी राणीचे आईवडील घरात बसलेले होते. पाऊस पाहत राणी गॅलरीत उभी होती. खेळतांना गॅलरीतून ती खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली.
तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. सहाय्यक फौजदार एन. एस. जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला. राणी ही पवार यांची एकुलती कन्या होती, असे पोलिसांनी सांगितले.