औरंगाबादमध्ये पहिले मराठा जात प्रमाणपत्र
By Admin | Updated: July 24, 2014 00:40 IST2014-07-24T00:33:42+5:302014-07-24T00:40:26+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्याचा मान रामेश्वर भानुदास निकम या १९ वर्षीय अभियांत्रिकी पदविकाधारक युवकास मिळाला आहे

औरंगाबादमध्ये पहिले मराठा जात प्रमाणपत्र
औरंगाबाद : जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्याचा मान रामेश्वर भानुदास निकम या १९ वर्षीय अभियांत्रिकी पदविकाधारक युवकास मिळाला आहे. मराठा समाजाचा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईएसबीसी) समावेश करून १६ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. मराठा जात प्रमाणपत्राच्या एक हजारावर अर्जांची आतापर्यंत विक्री झाली असून, आज सहा जणांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ रामेश्वरला यामुळे मिळणार आहे.
शिक्षण व नोकऱ्यांसाठी मराठा समाजास १६ टक्के, तर मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील आघाडी सरकारने घेतला होता. याबाबतचा अध्यादेश १५ जुलैला जारी करण्यात आला. अध्यादेश जारी केल्यानंतर लगेचच जात प्रमाणपत्रासाठी सेतू सुविधा केंद्रात विचारणा केली जात होती; परंतु याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले नव्हते. मराठा जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज, शपथपत्र तसेच जात प्रमाणपत्र यांचे नमुने त्यानंतर निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेनंतर मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना १७ जुलै रोजी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सहाव्या दिवशी म्हणजे २३ जुलै रोजी सेतू सुविधा केंद्रातून मराठा जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यास प्रारंभ झाला. अंबरवाडीकर्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदविका मिळविणाऱ्या रामेश्वर निकम यास मराठा जातीचे पहिले प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. भानुदास म्हस्के, शिवम म्हस्के, ऋषिकेश म्हस्के, वर्षा म्हस्के आणि संजय निकम या इतर पाच जणांना औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या सहीने मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खास शिबिरे घेतली जाणार आहेत.
‘अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाची प्रवेशप्रक्रिया सध्या राबविली जात आहे. अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत २८ जुलै रोजी संपणार आहे. या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा, या हेतूने मी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आरक्षणामुळे मला थेट दुसऱ्या वर्षात निश्चित प्रवेश मिळेल,’ असे रामेश्वर निकम याने सांगितले.
१९६७ चे पुरावे गरजेचे
मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे १९६७ चे पुरावे द्यावे लागणार आहेत. पंजोबा, आजोबा यांचे खासरा पत्र, वास्तव्याचे महसुली पुरावे, तसेच शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
सध्या मराठा जात प्रमाणपत्राच्या एक हजारावर अर्जांची विक्री झाली असून, शंभरावर प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.