हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना
By Admin | Updated: September 8, 2014 00:33 IST2014-09-08T00:25:28+5:302014-09-08T00:33:30+5:30
औरंगाबाद : पवित्र हज यात्रेचा प्रवास आजपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी चिकलठाणा विमानतळावरून थेट जेद्दाहला २३३ यात्रेकरू सायंकाळी ७.३० वाजता रवाना झाले.

हज यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना
औरंगाबाद : पवित्र हज यात्रेचा प्रवास आजपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी चिकलठाणा विमानतळावरून थेट जेद्दाहला २३३ यात्रेकरू सायंकाळी ७.३० वाजता रवाना झाले. ऐतिहासिक जामा मशीद येथे यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. पानावलेल्या डोळ्यांनी यात्रेकरूंना निरोप देण्यात आला. दररोज एका विमानाद्वारे मराठवाड्यातील २४०५ यात्रेकरू यात्रेला जाणार आहेत.
मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांतील हज यात्रेकरूंना पूर्वी मुंबई येथून विमानाने यात्रेला जावे लागत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय लक्षात घेऊन २००५ मध्ये शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी थेट औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली. तत्कालीन केंद्रीय नागरी उडयणमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सहकार्याने औरंगाबादहून विमानसेवा सुरू झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील २४०५ हज यात्रेकरू पवित्र यात्रेसाठी जाणार आहेत. सर्व यात्रेकरूंच्या थांबण्याची व्यवस्था आमखास मैदानाजवळील जामा मशिदीच्या अरबी मदरशात करण्यात आली आहे. यात्रेकरूंना दोन दिवस अगोदर येथे येऊन रिपोर्र्टिंग करावी लागत आहे. शुक्रवारपासूनच यात्रेकरू जामा मशीद येथे दाखल होत होते.यात्रेकरूंच्या सर्व कागदपत्रांची तपासणी, सामानाची तपासणी, चलन बदलणे, ‘अहराम’ (पांढरे कपडे) बांधणे आदी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व यात्रेकरू आपल्या सामानासह विमानतळाकडे जाण्यासाठी सज्ज झाले. स्वयंसेवकांनी त्यांचे सामान बसमध्ये ठेवले. चिकलठाणा विमानतळाकडे जाण्यापूर्वी निरोप घेण्याची वेळ आली. यात्रेकरूंसह अनेक नातेवाईकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. पवित्र हज यात्रा ४० दिवसांची असते. यात्रेकरू सुखरूप यावेत हीच प्रार्थना नातेवाईकांसह आप्तस्वकीयांची असते. यात्रेकरू बसमध्ये बसून चिकलठाणा विमानतळाकडे रवाना होऊ लागले. नातेवाईकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी जामा मशिदीजवळील रस्ते बॅरीकेट लावून बंद केले होते. मरकज- ए- हुजाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले की, सायंकाळी ७.२५ वाजता चिकलठाणा विमानतळावरून विमान जेद्दाहला रवाना झाले. यामध्ये १२३ पुरुष, ११० महिला आणि एक सहा महिन्यांची चिमुकली होती. दुपारी १२.०० ते १.३० दरम्यान सर्व यात्रेकरू विमानतळात दाखल झाले. जेवण झाल्यावर सायंकाळची नमाजही अदा करण्यात आली. त्यानंतर सर्व यात्रेकरू विमानात बसले. पहिल्या विमानाला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी महाराष्ट्र हज कमिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खालेद अरब यांच्यासह सिराज इनामदार, फारूक पठाण, मुस्तफा परकार, ए.एम. शेख, इब्राहीम पठाण, सुरजितसिंग खुंगर आदी उपस्थित होते.