आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:03 IST2025-07-31T18:01:31+5:302025-07-31T18:03:03+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याने खुलताबाद-गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ

आधी घरभाडे भत्ता बंद, आता वेतनवाढ बंदची नोटीस; मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांत खळबळ
- सुनील घोडके
खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील मुख्यालयी न राहणाऱ्या तब्बल १२५३ शिक्षकांचा तीन वर्षापूर्वी घरभाडे भत्ता बंद केलेला आहे. त्यानंतरही मुख्यालयी राहत नसल्याने या शिक्षकांना तीन वर्षांसाठी एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. यामुळे गंगापूर- खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबाद- गंगापूर मतदारसंघाचे आ. प्रशांत बंब हे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांनी मुख्यालयी राहण्यासाठी आग्रही असून याबाबत त्यांनी दोन्ही तालुक्यातील शिक्षकांच्या बैठकीत ही वारंवार सांगितले. पंरतू याबाबत सतत दुर्लक्ष होत असल्याने आ. प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार ८ सप्टेंबर २०२२ पासून खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील १२५३ मुख्यालयी न राहणा-या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. तीन वर्षांपासून या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद असला तरी मुख्यालयी राहण्यासाठी कुणीच तयार नसल्याचे चित्र असल्याचे चित्र आहे.
आ. प्रशांत बंब यांनी दिनांक 01.01.2025 रोजी वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील १२५३ मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात तीन वर्षासाठी बंद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी २९ जुलैच्या पत्रानुसार केंद्रप्रमुखामार्फत बजावण्यात आल्या आहेत. खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील शिक्षकांत एकच खळबळ उडाली आहे.
अनेक शिक्षकांनी बदल्या करून घेतल्या
खुलताबाद- गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी गंगापूर- खुलताबाद तालुका सोडून इतर तालुक्यात बदलीला प्राधान्य दिले आहे. तर इतर तालुक्यातून येणारे शिक्षक खुलताबाद- गंगापूर सोडून इतरत्र बदलीला महत्व देत आहे. कारण खुलताबाद- गंगापूर तालुक्यात मुख्यालयाचा मुद्दा त्रासदायक असल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.