औरंगाबाद: औरंगाबादेतील करोडी परिसरातील नियोजित पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ येथून पळवून पुण्याला पहिला मान देण्यात आला. आता करोडी येथे दुसरे क्रीडा विद्यापीठ बांधण्याचे आश्वासन देत त्यासाठी जास्तीची जागा ताब्यात घेण्यात येईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले.
तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी क्रीडा विद्यापीठासाठी मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहर उदयास येईल, या हेतूने ६०६ कोटींचा प्रस्ताव २०१७ मध्ये तयार केला होता. मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील उत्तम क्रीडापटूंना दर्जेदार सराव आणि सादरीकरणाची संधी मिळावी, यासाठी करोडीतील गट नं. २४ येथील १७० एकर जमिनीवर आजवर ते विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव होता.
केंद्रेकर यांनी त्या जागेवरील १६९ प्रस्ताव रद्द केले. त्यामध्ये काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्याच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावही रद्द केला. राज्यभरात क्रीडा विद्यापीठासाठी एवढी मोठी जागा कुठेही नसल्यामुळे करोडीतील जागा क्रीडा आयुक्तालयाने हेरली. तसेच पथकाने तेथे पाहणी करून ग्रीन सिग्नल दिले. मात्र, गेल्या सरकारच्या राजकारणात ते विद्यापीठ रखडले, तर विद्यमान सरकारने पुणेकरांना विद्यापीठ भेट म्हणून दिले.
समृध्दी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनलगत करोडी शिवार असल्यामुळे भविष्यातील एका गोल्डन ट्रँगल लगत ते विद्यापीठ होईल. ५० ते ६० एकरमध्ये ते विद्यापीठ करण्याचा सुरुवातीचा प्रस्ताव होता, परंतु अलीकडच्या काळात स्पोटर्स म्हणजे केवळ मैदानी ‘खेळ’ राहिला नाही, त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. प्रत्येक वर्गवारीनुसार शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, सरावांसाठी पुरेशी जागा लागणार हे गृहीत धरूनच करोडीच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी गेला होता. स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियानंतर क्रीडा विद्यापीठ ही मराठवाड्यातील सर्वस्तरातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे महाप्रवेशद्वार ठरू शकेल.
पालकमंत्री म्हणाले, पुण्यातील निर्णय योग्यच
पालकमंत्री देसाई यांनी सांगितले, क्रीडा विद्यापीठ येथून हलविलेले नाही. येथील क्रीडा विद्यापीठ होणारच आहे. बालेवाडी, पुणे येथील तयार सुविधांचा वापर म्हणून तेथे विद्यापीठाचा निर्णय झाला आहे. शासनाचा तो निर्णय योग्यच आहे. क्रीडा विद्यापीठ जिल्ह्यात व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मंजूर जागेत थोडी वाढ करण्याची गरज असून ती संपादित केली जाईल.