रेल्वेच्या खड्ड्यांमुळे चुकला शाळेचा पहिला दिवस
By Admin | Updated: June 20, 2014 01:11 IST2014-06-20T00:58:34+5:302014-06-20T01:11:10+5:30
औरंगाबाद : बनेवाडी येथे वर्षभरापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे विभागातर्फे नाली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु केवळ खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही.

रेल्वेच्या खड्ड्यांमुळे चुकला शाळेचा पहिला दिवस
औरंगाबाद : बनेवाडी येथे वर्षभरापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे विभागातर्फे नाली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु केवळ खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही. त्यामुळे जवळपास १५ फूट खोल असणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना याठिकाणी घडत आहेत. या खड्ड्याने येथील एका १२ वर्षाच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस चुकविला.
समीर शंकर पठारे असे या मुलाचे नाव आहे. १६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने समीरने त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याने समीर १५ जून रोजी सायंकाळी घरासमोर आपल्या मित्रांसोबत खेळत होता. परंतु खेळताना अचानक तोल गेल्याने तो समोर असणाऱ्या खड्ड्यात पडला. यावेळी त्याच्या हाताला आणि हनुवटीला मोठी इजा झाली. त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हनुवटीला झालेल्या इजामुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. आतापर्यंत त्याच्यावर जवळपास ८० हजार रुपये खर्च झाले असून, रेल्वेच्या अशा अर्धवट कामामुळे समीरवर ही वेळ आली. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने नातेवाई आणि इतरांकडून पैसे घेण्याची वेळ आल्याचे समीरचे वडील शंकर पठारे यांनी सांगितले.
खड्डे बुजविण्याची मागणी
खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातांची प्रशासनाने दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नितीन दाभाडे, गौतम साबळे, विकास झाल्टे, सुनील चुमकुरे, कुणाल कीर्तिशाही, पंकज भालेराव, गौतम केदारे आदींनी केली आहे.
वर्षभरात अनेक जण जखमी
बनेवाडी आणि राहुलनगरास जोडणाऱ्या रेल्वेपुलाच्या कामानंतर नालीसाठी खड्डे खोदण्यात आले. या खड्ड्यांच्या बाजूने वर्दळीचा रस्ता असल्याने पादचारी आणि वाहनांची ये-जा सुरू असते.
अचानक तोल गेल्याने वर्षभरात अनेक जण जखमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यातच याठिकाणी पथदिवेही नसल्याने रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत. अनेक जनावरे खड्ड्यात पडून जखमी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
निधीअभावी काम थांबले
बनेवाडी येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे; परंतु निधीअभावी काम थांबले आहे. लवकरच हे सुरू होईल.
-डी. चंद्रमोहन,
सहायक मंडल अभियंता, द.म.रे.
मुलांकडे लक्ष
खड्ड्यांमुळे खेळताना लहान मुले पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवावे लागत आहे.
- इंदूबाई मिसाळ
रेल्वेचे दुर्लक्ष
रेल्वेने नाल्याचे काम अर्धवट सोडून दिले. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. जखमी झालेल्या मुलाच्या उपचारासाठी रेल्वेने नुकसानभरपाई दिली पाहिजे.
-शैलेश झाल्टे