औरंगाबाद जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित ठणठणीत, घेताहेत काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 18:56 IST2020-12-16T18:54:04+5:302020-12-16T18:56:35+5:30
corona virus in Aurangabad राज्यात मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ १५ मार्च रोजी औरंगाबादेत काेरोनाचा शिरकाव झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित ठणठणीत, घेताहेत काळजी
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : प्रारंभीच्या काळात कोरोनाचे नावही घेतले तरी प्रत्येकाची धडधड वाढत होती. शहरात सर्वप्रथम एक प्राध्यापिकेला कोरोनाची बाधा झाली आणि औषधोपचाराने त्यांनी कोरोनावर विजयदेखील मिळविला. त्या घटनेला ९ महिने होत असून ‘त्या’ अगदी ठणठणीत आहेत. स्वत:सह कुटुंबियांचीही ‘त्या’ काळजी घेत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांची दिनचर्या सुरू आहे.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ १५ मार्च रोजी औरंगाबादेत काेरोनाचा शिरकाव झाला. एका शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने त्यांच्या संपर्कातील एकालाही बाधा झाला नाही; परंतु त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना नंतर प्रकृतीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पहिल्या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. सध्या त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहे. घराबाहेर कमीत कमी जाऊन त्या काळजी घेत आहेत. केवळ अत्यावश्यक बैठकींना त्या जातात.
अवघ्या ११ व्या दिवशी त्या स्वगृही
या प्राध्यापिका या ३ फेब्रुवारी रोजी रशिया येथे गेल्या होत्या. तेथून त्या ३ मार्च रोजी शहरात परतल्या. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्या १३ मार्च रोजी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची लक्षणे आणि प्रवासाच्या माहितीवरून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीअंती त्यांचा अहवाल कोरोना सकारात्मक आला. औषधोपचाराने कोरोनामुक्त होऊन अवघ्या ११ व्या दिवशी त्या स्वगृही परतल्या.
कमीत कमी घराबाहेर पडण्यावर कुटुंबियांचा भर
त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाहीत. पहिल्यांदा पॉझिटिव्ह म्हणून जाहीर झाल्यानंतर परिसरातील नागरिक अंतर राखत होते. रुग्णालय, डॉक्टरांसाठीही कोरोना नवीन होता. तरीही उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. सदर प्राध्यापिकेचा मुलगा डॉक्टर आहे. त्यांनी उपचारात महत्त्वाची भूमिका निभावली. घराबाहेर कमीत कमी पडण्यास कुटुंबियांकडून भर दिला जात आहे.
१५ मार्च रोजी आढळला जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण.
प्रत्येक महिन्याला असे वाढले रुग्ण
१ एप्रिल १
१ मे १७७
१ जून १५४३
१ जुलै ५,५६५
१ आगस्ट १४,१२३
१ सप्टेंबर २३,४६०
१ आक्टोबर ३३,६४८
१ नोव्हेंबर ३८,१४१
१ डिसेंबर ४३,३७८