छत्रपती संभाजीनगर जनरेशन बीटाच्या पहिल्या बाळाचे नवीन वर्षाच्या ४९ व्या मिनिटाला आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:52 IST2025-01-02T18:34:58+5:302025-01-02T18:52:38+5:30
सुपर! नव्या वर्षात अनेकांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन

छत्रपती संभाजीनगर जनरेशन बीटाच्या पहिल्या बाळाचे नवीन वर्षाच्या ४९ व्या मिनिटाला आगमन
छत्रपती संभाजीनगर : स्थळ : घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाची ओ.टी. वेळ मंगळवारी मध्यरात्रीची. बाहेर नातेवाईक नव्या पाहुण्याची वाट पाहत बसलेले कुटुंबीय. आतून आवाज दिला जातो आणि कुटुंबीय धावतच जातात. डाॅक्टर सांगतात, ‘मुलगा झाला... शुभेच्छा’. कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नाही. जन्माची वेळ रात्री १२:४९ वाजेची. २०२५ मध्ये जन्मलेले घाटीतील पहिले बाळ. या बाळाचे आनंदात स्वागत करण्यात आले.
घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात मध्यरात्री छाया नितीन पवार (रा. गांधीनगर) यांच्या सिझेरियन प्रसूतीला सुरुवात झाली. बाहेर कुटुंबीय बसून होते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची प्रतीक्षा होती. रात्री १२:४९ वाजता सिझेरियन प्रसूती झाली आणि मुलगा झाला. बाहेर वाट पाहत बसलेले बाळाचे वडील नितीन पवार, बाळाच्या काकू कल्पना पवार यांना डाॅक्टरांनी माहिती दिली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. डाॅक्टरांनी सांगितले, ‘२०२५ मधील घाटीत जन्मलेले हे पहिले बाळ आहे...’. त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला. सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे यांनी बाळाचे आणि नितीन पवार यांचे गुलाबपुष्प, शाल आणि बेबीकिट देऊन स्वागत केले.
या प्रसूतीसाठी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. अर्शिया सय्यद, डाॅ. ऐश्वर्या परळीकर, भूलतज्ज्ञ डाॅ. कुलकर्णी, डाॅ. अपूर्वा त्रिभुवन, डाॅ. साक्षी महात्मे, डाॅ. संपदा माने, डाॅ. तेजस पाटील, डाॅ. ज्योती अंकाडे, डाॅ. हर्षदा हिरे, ब्रदर विकास रहाणे, बाबासाहेब घाडगे, परिचारिका शमीम बेग, ज्योती वाव्हळ, कर्मचारी संगीता रामफळे, मंजू गडपकर, आदींनी प्रयत्न केले.
घाटीवर विश्वास
मला सहा वर्षांची मुलगी असून, तिचा जन्म घाटीत झालेला आहे. घाटीवर विश्वास असल्याने दुसरी प्रसूतीही घाटीत केली. सर्व डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
- नितीन पवार, बाळाचे वडील
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी किती बाळांचा जन्म?
घाटीत दुपारी ४ वाजेपर्यंत १७ प्रसूती झाल्या. यात ९ मुले आणि ८ मुलींचा जन्म झाला, तर खासगी रुग्णालयांत सायंकाळी ६ वाजेपर्यंत २८ बाळांचा जन्म झाला, अशी माहिती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डाॅ. ललिता बजाज यांनी दिली.