छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गोळीबार; जमीन व्यावसायिकावर पहाटे दोन राऊंड फायरिंग

By सुमित डोळे | Updated: March 26, 2025 12:46 IST2025-03-26T12:43:10+5:302025-03-26T12:46:07+5:30

छत्रपती संभाजीनगरची गुन्हेगारी गंभीर वळणावर, ३ दिवसांत दूसरा गोळीबार, व्यावसायिक बचावला; सहज उपसले जाताय शस्त्र, पिस्तुल

Firing again in Chhatrapati Sambhajinagar, two rounds fired on a land businessman at 4 am | छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गोळीबार; जमीन व्यावसायिकावर पहाटे दोन राऊंड फायरिंग

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा गोळीबार; जमीन व्यावसायिकावर पहाटे दोन राऊंड फायरिंग

छत्रपती संभाजीनगर: शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोंढ्यातील नवाबपुऱ्यात एका जमीन व्यावसायिकास वादातून पहाटे ४ वाजता दोन वेळा गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. जिन्सी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हसीब मोहम्मद सलीम काझी (३३) हे कुटुंबासह नवाबपुऱ्यात राहतात. २०२१ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांचा वडिलोपार्जित जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शिवाय, काही ठिकाणी गाळे भाड्याने दिलेले आहेत. बुधवारी पहाटे ४ वाजता ते रोजा सोडण्यासाठी खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी उठले होते. घरापासून ५० मीटर अंतरावर जाताच त्यांच्यावर पहिली गोळी झाडली गेली. दुचाकीचे टायर फुटले असावे, असे वाटल्याने ते खाली वाकताच अंधारात उभ्या व्यक्तीने त्यांना शिवी देत दुसरी गोळी झाडली. ती त्यांच्या कानाजवळून गेली. हसीब यांनी तत्काळ पुन्हा घराच्या दिशेने आरडाओरड करत धाव घेतली.

वरिष्ठांची धावाधाव, गुन्हे शाखा घटनास्थळी
घटनेची माहिती कळताच जिन्सी ठाण्यासह गुन्हे शाखेच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एका गोळीची केस मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. हसीब यांचे काही महिन्यांपासून दोन व्यक्तींसोबत जमिन आणि गाळा भाड्याने देण्यावरून वाद सुरू आहे. त्यापैकी नासेर सय्यद रौफ याने हा प्रकार केल्याचा संशय त्यांनी एफआयआरमध्ये व्यक्त केला आहे. त्याच व्यक्तीने त्यांच्यावर एका गुन्ह्याचा आरोप केला होता, मात्र तो निकाली निघाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

शहरात गुन्हेगारी गंभीर वळणावर
शहरात रविवारी कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने हवेत गोळीबार करत अवैध व्यवसायिकांकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गोळीबार झालाच नसल्याचे सांगत गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला, आणि हात वर केले. मात्र, गुन्हेगारांच्या टोळीकडे घातक शस्त्रांचा साठा असल्याचे छायाचित्रांसह लोकमतने वृत्त प्रकाशित केले. त्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा शहरात गोळीबार झाला आणि शस्त्रांची तस्करी व गुन्हेगारी गंभीर वळणावर गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Firing again in Chhatrapati Sambhajinagar, two rounds fired on a land businessman at 4 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.