फटाक्यांची हौस जिवावर बेतली; छत्रपती संभाजीनगरात दिवाळीत ६१ जण भाजले, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 14:50 IST2025-10-25T14:47:18+5:302025-10-25T14:50:01+5:30
एक नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटीच्याच अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

फटाक्यांची हौस जिवावर बेतली; छत्रपती संभाजीनगरात दिवाळीत ६१ जण भाजले, एक गंभीर
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत कोणतीही काळजी न घेता फटाके फोडण्याची हौस अनेकांच्या जिवावर बेतली. गेल्या तीन दिवसांत शहरात भाजलेल्या ६१ जणांची शासकीय रुग्णालयात नोंद झाली. यात घाटी रुग्णालयात २४ नागरिक उपचार घेऊन घरी गेले, तर एक नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटीच्याच अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बुधवारी दिवाळीच्या दिवशी पावसाने हजेरी लावली, तरीही लक्ष्मीपूजनादरम्यान शहरवासीयांनी जोरदार आतषबाजी केली. शहरात सर्वत्र धूमधडाक्यात फटाके फोडण्यात आले. मात्र, यादरम्यान काळजी न घेताच फटाके उडवल्याने तीन दिवसांत विविध भागांत लहान मुले, तरुण, महिला, पुरुष भाजल्याच्या अनेक घटना घडल्या. घाटी रुग्णालयात अशा भाजलेल्या २४ जणांवर उपचार करण्यात आले.
बुधवारी फटाके फोडताना हात व चेहरा १५ ते २० टक्के भाजलेल्या तरुणाला जळीत रुग्ण वॉर्डात दाखल करण्यात आले. चिकलठाणा येथील घटनेत फटाके फोडताना ११ जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खाजगी रुग्णालयाच्या प्राथमिक माहितीनुसार, तीन दिवसांत जवळपास २६ रुग्णांपैकी १४ जणांचे हात भाजले, तर दोघांचे चेहरेही भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.