अखेर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गे पुणे रस्त्याच्या डागडुजीसाठी ३५ कोटींचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:20 IST2025-10-29T17:17:06+5:302025-10-29T17:20:02+5:30
६० कि.मी. अंतरात खड्डेच खड्डे : पाच तासांच्या प्रवासाला लागतात ९ तास

अखेर छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गे पुणे रस्त्याच्या डागडुजीसाठी ३५ कोटींचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर मार्गे पुणे या विद्यमान मार्गाचे नूतनीकरण वर्षापासून रखडले आहे. परिणामी, ५० टक्के मार्ग खड्डेमय असून दररोज सुमारे २० हजार वाहनांना खड्ड्यांतून मार्ग काढत जावे लागते आहे. दिवाळसणात या रस्त्यावरील वाहतुकीचा खाेळंबा सोशल मीडियातून चव्हाट्यावर आला. खड्ड्यांमुळे पाच तासांचा प्रवास नऊ तासांवर गेल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर नाशिक सा. बां. विभागाने ३५ कोटींतून रस्त्याच्या डागडुजीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. वडाळा ते अहिल्यानगर या सुमारे ५० ते ६० कि.मी. अंतरातील दुरूस्ती यातून होईल. पुढच्या महिन्यात काम सुरू होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी लोकमतला सांगितले.
हा मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरित करण्यासह मागार्ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये घेतला. एनएच-७५३ एफ क्रमांक दिला. पुणे-शिरूर-अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, असे ते काम आहे. पुणे ते शिरूर या ५३ कि.मी. मार्गाचे ७ हजार ५१५ कोटींतून सहा पदरीकरण व शिरूर-अहिल्यानगर बाह्यवळण रस्त्यामार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासह सुमारे ९ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. यात ३० टक्के म्हणजेच २२५४ कोटी संस्थात्मक कर्जाद्वारे तर ७० टक्के म्हणजेच ५२६० कोटी महामंडळ बँकांकडून कर्ज घेईल. अहिल्यानगर ते देवगडपर्यंतचा रस्ता ४१० कोटींतून होईल. त्यापुढील काम ६०० कोटींतून होईल. काम पूर्ण झाल्यावर टोलवसुली सुरू होईल.
रस्त्याचे त्रांगडे
सध्या शिरूर ते नगर ते देवगडमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत टोल सुरू आहे. डिसेंबर २०२९ व जानेवारी २०३७ पर्यंत टोल वसुली संपल्यावर बांधकाम विभागाकडेच रस्ता राहील. नगर ते देवगड या अंतरातील रस्ता टोलवसुली संपल्याने हे अंतर महामंडळाकडे हस्तांतरित होईल. पुणे ते शिरूर या अंतरातील ७५१५ कोटींचे काम करण्यास ३० वर्षे टोल वसुलीसह बीओटीवर महामंडळ करील. काम पूर्ण झाल्यावर २००८ च्या धोरणानुसार टोलवसुली केली जाईल. पण डागडुजीबाबत एमएसआयडीसी सध्या काहीही बोलण्यास तयार नसल्याने बांधकाम विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.
सध्या अवस्था कशी?
वडाळा-घोडेगाव, पांढरीपूल, घाटमार्ग अहिल्यानगरपर्यंत रस्ता खड्ड्यांत आहे.
रोज २० हजार वाहनांचा राबता आहे.
रुंदीकरण २४ वर्षांपूर्वी झाले.
डिसेंबर २०२९ व जानेवारी २०३७ पर्यंत टोल वसुली आहे.