अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 18:49 IST2022-02-18T18:48:12+5:302022-02-18T18:49:27+5:30
सर्व स्तरातून मागणी झाल्यानंतर शासनाचा निर्णय

अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने ५०० कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी कळविली आहे.
राजधानीचे ठिकाण म्हणून जिल्ह्याला ५०० कोटींची तरतूद अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादसाठी किमान ५०० कोटींचा निधी मिळावा. यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ३ जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ जानेवारीच्या नियाेजन विभागाच्या बैठकीत ‘खो’ दिला होता.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत ३२५ कोटींच्या मर्यादेत पालकमंत्री देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने ५०० कोटी रुपयांच्या १८४ कोटींच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला होता. परंतु कोविड, महसुलात घट इत्यादीमुळे जिल्ह्याला ७० कोटी रुपये अधिक देत ३८५ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.
...यासाठी हवा होता वाढीव निधी
औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीचे शहर आहे. या ठिकाणी मराठवाड्यासह लागून असलेल्या इतर विभागांच्या जिल्ह्यांतील रुग्णही घाटीत उपचारासाठी दाखल होतात. कोरोनासारख्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याशिवाय इतर विकासकामे करणे निधीअभावी शक्य होत नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे वाहून गेले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आहे. तसेच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. शहरी लोकसंख्या, पर्यटन सुविधा, अत्याधुनिक पोलीस वाहने, शाळा दुरुस्ती इ. बाबींच्या विकासासाठी निधी आवश्यक असल्याने वाढीव १८४ कोटी निधी मंजूर करावा, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे निधी वाढवून मिळाल्याचे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.