संचिका तुंबल्या; नगरसेवकांचा ठिय्या

By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:11:49+5:302014-11-29T00:30:58+5:30

औरंगाबाद : विकासकामांच्या संचिका तुंबल्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आज पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच सायं. ६ वा. ठिय्या दिला.

File tumbles; Corporators stance | संचिका तुंबल्या; नगरसेवकांचा ठिय्या

संचिका तुंबल्या; नगरसेवकांचा ठिय्या

औरंगाबाद : विकासकामांच्या संचिका तुंबल्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आज पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच सायं. ६ वा. ठिय्या दिला. आयुक्त पी.एम. महाजन यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्यासारखाच मनपात न येता बंगल्यावर अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच प्रशासकीय कारभार सुरू केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक प्रमोद राठोड, कृष्णा बनकर, विजेंद्र जाधव, अमित भुईगळ, मिलिंद दाभाडे यांनी विकासकामांच्या संचिका तुंबल्यामुळे आयुक्तांविरोधात घोषणा देऊन ठिय्या दिला.
अभ्यागतांच्या वेळेत तरी आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी मनपात असले पाहिजे. अनेक नागरिक आयुक्तांची वाट पाहत बसले होते. नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा आयुक्त फोन घेत नाहीत, असे आरोप नगरसेवकांनी केले. दरम्यानच्या काळात आयुक्तांनी बंगल्यावर अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. त्यामुळे आयुक्त पालिकेत आले नाहीत. सभापती विजय वाघचौरे, नगरसेवक काशीनाथ कोकाटे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त किशोर बोर्डे यांनी मध्यस्थी करून नगरसेवकांचा ठिय्या सोडविला.
नगरसेवक म्हणतात...
नगरसेवक कृष्णा बनकर म्हणाले की, १९ नोव्हेंबर रोजी विकासकामांच्या संचिकांसाठी आयुक्तांना पत्र दिले आहे. अजून त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. नगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले की, आयुक्त हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. नागरिक त्यांची वाट पाहून निघून गेले आहेत. त्यांनी सर्वाधिकार स्वत:कडे ठेवले आहेत. त्यांना वेळ नसेल तर त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे काही अधिकार दिले पाहिजेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा केला जात नाही. कारण त्यांची बिले अदा केलेली नाहीत. नगरसेवक दाभाडे म्हणाले की, सहा महिन्यांपासून संचिका तुंबल्या आहेत. आयुक्त नागरिकांचा अंत पाहत आहेत. त्यांची ही दादागिरी आहे. नगरसेवक अनिल जैस्वाल म्हणाले की, अनेक कामे सुरू होऊन अर्धवट पडली आहेत. जी कामे मंजूर आहेत, त्यांचा तरी विचार होणे गरजेचे आहे.

Web Title: File tumbles; Corporators stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.