सिल्लोडमधून जन्मप्रमाणपत्र काढलेल्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करा; सोमय्यांची पोलीसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:54 IST2025-02-25T18:53:45+5:302025-02-25T18:54:11+5:30
आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नाही तर बांगलादेशी रोहिंग्याशी आहे: किरीट सोमय्या

सिल्लोडमधून जन्मप्रमाणपत्र काढलेल्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करा; सोमय्यांची पोलीसांत तक्रार
सिल्लोड : तालुक्यात ४०६ जणांनी फक्त आधारकार्डचा पुरावा देऊन जन्म प्रमाणपत्र काढले आहे. त्या ४०६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथील शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये १० हजारांहून अधिक तर सिल्लोड तालुक्यांमध्ये ४ हजार ७३० बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज, मंगळवारी दुपारी सोमय्या सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयात दाखल झाले. त्यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार तहसीलदार संजय भोसले यांच्याशी चर्चा करून किती जणांना प्रमाणपत्र दिले, काय पुरावे घेतले याची चौकशी केली. त्यानंतर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्याकडे त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मिरकर, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, माजी नगरसेवक मनोज मोरेलू, विष्णू काटकर, नारायण बडक आदींची उपस्थिती होती.
आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नाही
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की ,जन्माचे दाखले देणे म्हणजे नागरिकत्व देणे. मात्र हे प्रमाणपत्र देताना सबळ पुरावे घेणे प्रशासनाचे काम होते. त्यामुळे प्रशासनाने देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला. पुरावाच नाही तर प्रमाणपत्र कसे दिले. हा देशाशी केलेला अपराध आहे. देशभर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी रोहिंगे राहत आहेत. आमची लढाई सरकारी कर्मचाऱ्यांशी नसून बांगलादेशी रोहिंग्याशी आहे. सिल्लोडमध्ये कागदपत्रांची शहानिशा न करता फक्त आधार कार्डच्या आधारे ४०६ लोकांना जन्मप्रमाणपत्र दिले. तहसील कार्यालयाने प्रमाणपत्र देण्याचे दुकान उघडले आहे.