पंधरा शाळांची मान्यता धोक्यात
By Admin | Updated: July 6, 2016 00:21 IST2016-07-05T23:58:30+5:302016-07-06T00:21:24+5:30
औरंंगाबाद : शाळेला मान्यता एका ठिकाणची; परंतु ती भरते दुसऱ्याच ठिकाणी. यासंदर्भात शिक्षण विभागालादेखील संबंधित संस्थाचालकांनी अंधारात ठेवले आहे.

पंधरा शाळांची मान्यता धोक्यात
औरंंगाबाद : शाळेला मान्यता एका ठिकाणची; परंतु ती भरते दुसऱ्याच ठिकाणी. यासंदर्भात शिक्षण विभागालादेखील संबंधित संस्थाचालकांनी अंधारात ठेवले आहे. नुकतेच आरटीई कायद्यानुसार राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे शाळांचा हा उद्योग समोर आला. जिल्ह्यात अशा १५ शाळा असून नियमाप्रमाणे त्या सर्व शाळांची मान्यता रद्द होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली.
आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वच शासन मान्य शाळांना बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीला शाळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्यावेळी काही शाळांनी मूळ मान्यता असलेल्या ठिकाणचा पत्ता नोंद केला होता. त्यानंतर २५ टक्के मोफत जागांवर विद्यार्थ्यांचे नंबर लागले. प्रवेश घेण्यासाठी पालक संबंधित पत्त्यावर गेले तेव्हा परिसरातून शाळाच गायब होत्या. अनेक पालकांनी नमूद पत्त्यावर शाळा सापडत नसल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे यासंबंधीच्या तक्रारींचा ओघ वाढत राहिला.
शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तक्रारींची सत्यता पडताळून पाहिली असता सदरील शाळांनी सुरुवातीला एका ठिकाणची शासनाची मान्यता घेताना; परंतु विद्यार्थी संख्या अपुरी पडू लागल्यामुळे त्या शाळांनी परस्पर दुसऱ्याच ठिकाणी शाळा सुरू केली. मात्र, आरटीई प्रवेशप्रक्रियेवेळी त्या शाळांनी आॅनलाईन नोंदणी करताना मूळ पत्ता नमूद केलेला होता. प्रत्यक्षात शाळांचे स्थलांतर करताना शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, या शाळांनी परस्पर दुसऱ्या परिसरात स्थलांतर केले आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेमुळे अशा शाळांचे पितळ उघडे पडले. ज्या शाळा स्थलांतर करण्यापूर्वी शिक्षण विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय ज्या शाळा परस्पर स्थलांतर करतात, त्यांची मान्यता शासन निर्णयानुसार आपोआप रद्द होते. यासंबंधी शिक्षण विभागाकडून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. परस्पर स्थलांतर केलेल्या शाळांमध्ये अनेक नामांकित संस्थांच्या शाळांचा समावेश आहे.