पंधरा हजारांवर शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: December 20, 2015 23:48 IST2015-12-20T23:41:32+5:302015-12-20T23:48:33+5:30
कळंब : दुष्काळात शेतकऱ्यांना मदत मिळणे तर दूरच परंतु, मंजूर झालेली हक्काची विमा रक्कम देखील हातात पडत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

पंधरा हजारांवर शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा
कळंब : दुष्काळात शेतकऱ्यांना मदत मिळणे तर दूरच परंतु, मंजूर झालेली हक्काची विमा रक्कम देखील हातात पडत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील सुमारे पंधरा हजारावर शेतकरी सध्या विमा रकमेच्या प्रतीक्षेत असून, मागील तीन महिन्यांपासून याबाबत नुसतीच चर्चा रंगविली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्यात २०११ पासून दरवर्षी पावसाचे प्रमाण घटतच चालले आहे. प्रत्यके वर्षी ‘मागचे साल बरे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मशागत, पेरणी, बियाणे, मजुरी यासह विविध कामासाठी मोठा खर्च करूनही त्यातुलनेत उत्पादन मात्र हाती पडत नसल्याचे चित्र आहे. अशा कठीण स्थितीत शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा चांगला आधार मिळतो. तालुक्यात सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी हंगामातील पिके विमा संरक्षित केली होती. या हंगामातील पिके हातची गेल्याने शेतकरी विमा कंपनीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. तालुक्यात गंभीर दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.
तालुक्यातील १७ हजार ५७७ शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांसाठी जवळपास ९५ लाख रूपयांचा विमा हप्ता भरला होता. निसर्गाने व भूगर्भातील पाण्याने साथ न दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांची पिके वाया गेली होती. गतवषीर्चा हंगाम संपून आता चालू वर्षाचा रबी हंगाम अंतिम टप्यात आला. मात्र, अद्याप गतवर्षीच्या रबी पिकांची विमा रक्कम मिळण्याचा पत्ता नाही. दिवाळीत नाही तर किमान आगामी विमा हप्ता भरण्यासाठी तरी रक्कम ही मिळेल अशी आशा होती. तीही आता मावळली आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा’, असे म्हणत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)