छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी (दि. ९) उघडकीस आला. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेल्या २ पानी सुसाईड नोटमध्ये विद्यापीठातील २ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.
काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. ठाकरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्याकडून त्रास देण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याशिवाय आई, अमित, कल्पना आणि श्री तुम्ही सर्व मला माफ कराल, अशी आशा करते. कारण मी जगाचा निरोप घेत आहे. खूप कंटाळा आलाय मला जगायचा. औरंगाबादमध्ये आल्यापासून खूप धावपळ झाली. जगताना, संसार करताना आणि ऑफिसचे काम करताना खूप धावपळ झाली. संसार करताना जितका त्रास झाला नाही तितका त्रास मला माझ्या ऑफिसमुळे झाला. ऑफिसमधील सहकारी मला खूप त्रास देतात. त्यांच्या सततच्या त्रासामुळे माझी आता जगण्याची इच्छा संपली असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
चौकशी समितीने दोषी ठरवलेसंबंधित उपकुलसचिवांनी कुलगुरूंच्या परस्पर सह्या करीत कंत्राटदारासोबत पत्रव्यवहार केला. काही कामगारांच्या नियुक्त्या केल्या. त्यावर प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये येऊन शिवीगाळ केली. त्याविषयी मी कुलगुरू, पोलिस आयुक्त आणि कुलपतींकडे तक्रार नोंदवली होती. त्यावर कुलपती कार्यालयाने संबंधित प्रकरणात चौकशीच्या सूचना कुलगुरूंना दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या प्राथमिक चौकशीत उपकुलसचिवांना दोषी ठरविले आहे. याविषयी त्यांना पत्र देण्यात आले. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.- डॉ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव
डॉक्टरांच्या परवानगीनंतर जबाबमहिला उपकुलसचिवांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, जबाब देण्याची परिस्थिती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने बुधवारी जबाब नोंदवता आलेला नाही. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाईल.- मंगेश जगताप, पोलिस निरीक्षक, बेगमपुरा पोलिस ठाणे