परतीच्या पावसाच्या धास्तीने वॉटरप्रूफ लायटिंगकडे ओढा; चायना-इंडियन लायटिंगचा लखलखाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:18 IST2025-10-17T16:17:21+5:302025-10-17T16:18:19+5:30
यंदा ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने वॉटरप्रूफ लायटिंग खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसत आहे.

परतीच्या पावसाच्या धास्तीने वॉटरप्रूफ लायटिंगकडे ओढा; चायना-इंडियन लायटिंगचा लखलखाट
छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या दिवाळी खरेदीत ‘स्वदेशी’ उत्पादने खरेदी करा, अशी साद घालण्यात आली आहे. बाजारात मात्र भारतीय बनावटीच्या व मेड इन चायना लायटिंगचा लखलखाट पाहण्यास मिळत आहे. यंदा ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने वॉटरप्रूफ लायटिंग खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसत आहे.
पाण्यात भिजली तरी लायटिंग होणार नाही खराब
पाऊस पडला तर लायटिंग खराब होते, शॉक लागतो, अशी तक्रार येत असते. मात्र, यंदा देशभरात पावसाने थैमान घातले आणि अजूनही ऐन दिवाळीत परतीचा पाऊस जोर लावणार असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे बाजारात वॉटरप्रूफ लायटिंग आल्या आहेत. कितीही पाऊस आला तरी बिनधास्त राहा. कारण, पाण्यात या लायटिंग खराब होत नाहीत. पावसात भिजली तरीही लायटिंगचा लखलखाट कायम राहील अशा लायटिंगची किंमत ६०० रुपयांपासून पुढे आहे.
- किशोर संकलेचा, व्यापारी
१४ रुपयांपासून लायटिंग
मेड इन चायनाने लायटिंगच्या बाजारात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. १०० पेक्षा अधिक व्हरायटी बाजारात आल्या आहेत. यात अवघ्या १४ रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत लायटिंग उपलब्ध आहेत.
- रौनक बोरा, व्यापारी
रिमोटची लायटिंग लई भारी
रिमोटने ऑपरेट करता येईल अशा लायटिंग बाजारात आल्या आहेत. भारतीय असो वा चिनी लायटिंग ग्राहकांना जरा हटके, आकर्षक, आधुनिक लायटिंग पाहिजे असते. त्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करण्याची तयारी ग्राहक दाखवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पणतीच्या विद्युत तोरणाला विशेष मागणी
बाजारात पणतीच्या आकाराची पारदर्शक विद्युत तोरणे आली आहेत. लहान-मोठ्या आकारातील विद्युत पणत्यांचे तोरण, तसेच ओम, स्वस्तिक अशा आकारातील माळा, झीरो बल्बच्या माळांनाही आवर्जून मागणी दिसून येत आहे.