लाडक्या बहिणींमध्ये वाढली धाकधूक; निकषांची पुनर्रचना, अर्जांची होणार पुन: छाननी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:26 IST2024-12-14T17:25:25+5:302024-12-14T17:26:21+5:30
महायुतीचे सरकारचा शपथविधी होऊन एक आठवडा होत नाही तोच योजनेतील लाभार्थ्यांच्या निकषांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींमध्ये वाढली धाकधूक; निकषांची पुनर्रचना, अर्जांची होणार पुन: छाननी
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाला, तो ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने’तून. निवडणुकीत या योजनेभोवतीच प्रचार फिरला. आता महायुती सत्तेत आल्यानंतर योजनेत आजवर आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली असून, पुण्यात १० हजार लाभार्थ्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
ही योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी आरोप केले. त्याला सत्ताधाऱ्यांनी दिलेले उत्तर, कोर्टात दाखल झालेली याचिका, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निवडणुकीच्या प्रचारात घमासान झाले. २१०० रुपये महायुती देणार, असे जाहीरनाम्यातून लाडक्या बहिणींना वचन दिले गेले, तर महाविकास आघाडीने ३ हजार रुपये दरमहा देण्याचे जाहीरनाम्यातून सांगितले हाेते. महायुतीचे सरकारचा शपथविधी होऊन एक आठवडा होत नाही तोच योजनेतील लाभार्थ्यांच्या निकषांची पुनर्रचना करण्यात आली आहे. योजनेचा सहावा हप्ता किती लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार, याकडे लक्ष लागले आहे.
१ हजार ५१८ कोटी ८४ लाख वाटप...
मराठवाड्यातील २० लाख २५ हजार १२९ महिलांना ६ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ५१८ कोटी ८४ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे वाटप केले. पाच हप्ते पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यांवर दिले आहेत. सहावा हप्ता कधी आणि किती लाभार्थ्यांना मिळणार हे विभागातील सगळ्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पुन: छाननी सुरू झाल्यानंतरच कळेल. सध्या तरी अर्जांची छाननी करण्याबाबत शासनाकडून काहीही सूचना नाहीत. असे विभागीय प्रशासनाने सांगितले. २१ लाख २ हजार १३८ अर्ज या योजनेसाठी आले होते. २० लाख २५ हजार १२९ अर्ज पात्र ठरले. ५ हजार ८५६ अर्ज तत्त्वत: मंजूर केले. ४१ हजार २५८ अर्ज तत्त्वत: रद्द केले; तर ६ हजार २३८ अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ६३ हजार ६५७ अर्ज रद्दबातल ठरविले.
जिल्हा......................लाभार्थी
छत्रपती संभाजीनगर.......४ लाख १३ हजार ६२४
लातूर..............२ लाख २० हजार ३६१
बीड.............२ लाख ९४ हजार ८९३
परभणी............१ लाख ८७ हजार ३०७
जालना............२ लाख ११ हजार ७३२
हिंगोली...............१ लाख २९ हजार २०३
धाराशिव............२ लाख १३ हजार ५३६
नांदेड...........३ लाख ५४ हजार ४७३
एकूण ............२० लाख २५ हजार १२९