निवडणुकीत सून जिंकल्यामुळे सासऱ्याची पपईची बाग केली उद्ध्वस्त
By राम शिनगारे | Updated: December 25, 2022 20:32 IST2022-12-25T20:32:16+5:302022-12-25T20:32:28+5:30
साडेतीनशे झाडे अर्ध्यातूनच कापली, लाखोंचे नुकसान

निवडणुकीत सून जिंकल्यामुळे सासऱ्याची पपईची बाग केली उद्ध्वस्त
औरंगाबाद: ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सून निवडून आल्यामुळे सासऱ्याची साडेतीनशे पपईची झाडेच अज्ञातांनी रातोरात कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार करोडी शिवारात घडला आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
ग्रा.पं. निवडणुकांचे निकाल २० डिसेंबर रोजी लागल्यानंतर त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहराजवळील करोडी गावातील शेतकरी रामभाऊ धोंडिबा दवंडे यांची गट क्र. ८५ मध्ये सात एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी पपईच्या ७०० झाडांची लागवड केली हाेती. करोडी ग्रा.पं. निवडणुकीत त्यांची सून सोनाली दवंडे या जिंकल्या. निकालाच्या दुसऱ्याच रात्री रामभाऊ यांच्या शेतातील पपईची तब्बल ३५० पेक्षा अधिक झाडे अर्ध्यातून कापून टाकली. रामभाऊ यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिली.
दिवसरात्र करून पिकाला सांभाळले
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत इतर पिके गेली. दिवसरात्र करून पपईला जोपासले. ग्रामपंचायत निवडणूक आली. त्यात सूनबाई उभ्या राहिल्या. त्यांचा विजयही झाला. एक-दोन दिवसांनी पपई उतरवून बाजारात नेण्यात येणार होती. मात्र, विरोधकांच्या पचनी हे पडलेच नाही. रात्रीतून पपईची बागच उद्ध्वस्त केली असल्याचे सांगताना रामभाऊ यांना अश्रू आवरता आले नाहीत.