शेतकऱ्यांची चिंता मिटली; जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:05 IST2025-07-18T16:58:28+5:302025-07-18T17:05:02+5:30
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

शेतकऱ्यांची चिंता मिटली; जायकवाडी धरणातून दोन्ही कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले
पैठण : येथील जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामासाठी उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेक बुधवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात यावर्षी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे सिंचनासाठी धरणाच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याची मागणी विविध आमदारांनी केली होती. त्यानंतर मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजवा कालव्यात २०० क्युसेकने तर डाव्या कालव्यात सायंकाळी पाच वाजता १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, उपविभागीय अभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खराडकर, आबासाहेब गरुड, अब्दुल बारी गाझी, संजय चव्हाण, रामनाथ तांबेआदींची उपस्थिती होती. या पाण्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांमधील जवळपास २ लाख ४० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार असल्याचे कार्यकारी अभियंता संत म्हणाले.
डाव्या कालव्यास अधिक फायदा
डावा कालवा २०८ किलोमीटर आहे. या कालव्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. तर उजवा कालवा १३२ किलोमीटरचा असून यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागातील ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा होणार आहे.
सिंचनासाठी फायदा
खरीप हंगाम २०२५-२६ साठी उजवा व डावा कालव्याद्वारे पाणी पाळी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. सदरील पाणी पाळी ही ९ ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे.
-प्रशांत संत, कार्यकारी अभियंता