मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:54 IST2025-11-06T12:52:48+5:302025-11-06T12:54:41+5:30
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजेत अशीही केली मागणी

मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली थट्टा; ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे २, ३ रुपये आणि ६ रुपये देऊन थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजे, सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही. मात्र, जे जाहीर केले ते तातडीने द्या, असा हल्लाबोल उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदर (ता. पैठण) येथे बुधवारी सरकारवर केला.
मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे आजपासून ४ दिवस मराठवाड्याच्या दाैऱ्यावर आहेत. या ‘दगाबाज रे’ संवाद यात्रेची सुरुवात नांदर येथे झाली. ठाकरे म्हणाले की, सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले, तेव्हा दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे सांगितले होते. मात्र, दिवाळीत शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही. खोटे बोलणारे सरकार असून, यांच्याविरोधात एकीने उभे राहा.
कर्जमुक्तीच हवी!
बीड : उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील पाली येथेही बुधवारी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले. त्यांनी सरकारला ‘दगाबाज’ म्हणत, निवडणुकीत याच ‘दग्याने’ प्रत्युत्तर द्या, असा हल्लाबोल सरकारवर चढवला. शेतकरी गुन्हेगार नाही, तो अन्नदाता आहे, त्यामुळे त्याला ‘माफी’ नको, तर ‘कर्जमुक्ती’ हवी आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा व भूम तालुक्यांतील शेतकऱ्यांशीही संवाद साधला.