सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:12 IST2020-03-19T15:57:08+5:302020-03-19T16:12:09+5:30
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान
सेनगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ फिटता फिटेना बुधवारी रात्री तालुक्यातील चिंचखेडा, आमदरी, लिंबाला, तांदलवाडी, बोडखा, येलदरी, सुकळी,खुडज ,पुसेगाव ,सेनगाव आदी भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात काही ठिकाणी अक्षरशः गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या असमतोलपणामुळे मेटाकुटिला आला आहे. खरीप हंगामात काढणीचा वेळी अतिवृष्टी झाला ने सोयाबीन, तुर, कापूस आदी पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना. रब्बी पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस ,गारानी झोडपून काढले आहे. मगळवारी रात्री तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.या पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले .परंतु बुधवारी रात्री तालुक्यातील सर्वच भागात जोरदार गारासह पाऊस झाला .तब्बल तासभर झालेल्या पावसाने शेतात उभे तसेच काढून ठेवलेल्या गहू,हरभरा आदी
पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही तासांच्या गारपिटीमुळे तोंडचा घास तालुक्यातील रावून घेतला गेला आहे.गारपिटीमुळे चिंचखेडा,येलदरी,सुकळी खु,सुकळी बु या परिसरातील शेतात गाराचा खच झाला.उभा असलेला गहु,हरभरा जागेवरच आडवा झाला. त्या मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, मागील चार पाच वर्षापासून या भागात गारपीट ही रब्बी हंगामात नित्याची होऊन बसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे, खरीपातील सोयाबीन अतिवृष्टी मुळे उध्वस्त झाले . आता गहू, हरभरा ज्वारी नगदी पिके हातची गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे . फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे .या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.