पाटोद्यात मदतीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: August 13, 2014 00:59 IST2014-08-13T00:33:18+5:302014-08-13T00:59:23+5:30
पाटोदा : जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी

पाटोद्यात मदतीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
पाटोदा : जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी बालाघाट विकास आघाडीच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी उपविभागीय कार्यालय दणाणले होते.
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर हा भाग डोंगरी विभागात येतो. येथे दरवर्षीच पावसाचे प्रमाण अल्प असल्याने येथील शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. यामुळे येथे शेतकरी सतत आर्थिक संकटात असतात. कधी दुष्काळ तर कधी गारपीट याने शेतकरी अधिकच खचलेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण अल्प असले तरी सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. पेरणीनंतर पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे, मशागत यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. पाऊसच नसल्याने हे कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, पीक कर्जाला व्याज न लावता नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतून विहिरी खोदल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे अद्याप पैसेच न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे या विहिरींचे पैसे देण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली. पाटोदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरीही मोठ्या प्रमाणावर आहेत. या शेतकऱ्यांना कांदाचाळसाठी अनुदान द्या, अशी मागणीही यावेळी केली.
पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. २०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या द्वारे दुषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, पशुधनासाठी छावण्याऐवजी शेतकऱ्यांना रोख रक्कम मदत द्यावी.
पन्नास वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली. गंभीर बाब म्हणजे दुष्काळाच्या भयाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात वाढू नये यासाठी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलकांमध्ये बालाघाट विकास आघाडीचे प्रमुख विष्णुपंत घोलप, राजाभाऊ देशमुख, दिलीप रंधवे, पांडुरंग दगडखैर, राहूल चौरे, महादेव नागरगोजे, हरिदास शेलार, बाळासाहेब जायभाये, महेश आजबे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रभारी तहसीलदार भारत सूर्यवंशी, गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)