गायरानसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By Admin | Updated: August 6, 2014 02:26 IST2014-08-06T00:53:10+5:302014-08-06T02:26:15+5:30

कडा : आष्टी तालुक्यातील ४५ गावातील गायरानधारक शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

Farmers' fasting for the Gairan | गायरानसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

गायरानसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

कडा : आष्टी तालुक्यातील ४५ गावातील गायरानधारक शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांकडे अद्यापही तहसील प्रशासनाने लक्ष न दिल्याने उपोषणकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगाव, सुर्डी, करेवाडी, सांगवी, वडगाव, दादेगाव, लोणी, चोभा, पारूडी, निमगाव, धिर्डी, पाटसरा, घोंगडेवाडी, मांडवा, कानडी, बोरोडी, फातेवडगाव, पिंपरखेड, वाकी आदी ४५ गावातील शेतकरी गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून गायरान जमीन कसत आहेत. तालुक्यातील जवळपास ८०० शेतकऱ्यांकडे सध्या गायरान जमिनीचा ताबा आहे. काही शेतकऱ्यांची आता दुसरी पिढी गायरान जमीन कसू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेने शेतकरी विविध पीक गायरान जमिनीत घेऊन आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
असे असले तरी अद्यापही या गायरान जमिनीचे मालकी हक्कात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव लागलेले नाही. सातबारा आपल्या नावे करावा यासाठी गायरानधारकांनी अनेकदा रास्तारोको, उपोषण आदी आंदोलन केले आहे. मात्र यानंतरही गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे होत नसल्याने शेतकऱ्यांतून आता संताप व्यक्त केला जात आहे.
आष्टी तालुक्यातील अनेक भूमिहीन, दलित, आदीवासी, भटके, विमुक्त समाजाकडे या गायरान जमीनीचा ताबा आहे. यामुळे या वंचित घटकांना आतापर्यंत आपला उदरनिर्वाह करणे सोयीचे झाले आहे. मात्र आता गायरान जमिनी आपल्याकडून सरकार काढून घेते की काय अशी भावना शेतकऱ्यांत बळावली असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी सांगितले.
या गायरान जमिनी शेतकऱ्यांनाच मिळाव्यात यासाठी सोमवारपासून आष्टी येथील तहसील कार्यालयासमोर गायरानधारकांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात ग्यानबा साळवे, भानुदास गायकवाड, सुनील अडागळे, अशोक गायकवाड, दगडू काळे, महेश भोसले, रघुनाथ वाघमारे, संगीता भोसले, रावसाहेब खंडागळे, दादा खंडागळे, मतीन चव्हाण, विश्वनाथ बर्डे, बापू खुडे, दत्तात्रय थोरात यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
या उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे. मात्र अद्यापही तहसील प्रशासनाने या आंदोलकांकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रशासन गायरान धारकांचा प्रश्न सोडवित नसल्याने हे उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असल्याचे यशवंत खंडागळे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Farmers' fasting for the Gairan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.