शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे रखडली
By Admin | Updated: June 23, 2014 00:29 IST2014-06-22T23:59:29+5:302014-06-23T00:29:16+5:30
सोयगाव : राज्यातील गटसचिवांनी दि. ५ जूनपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे रखडली
सोयगाव : राज्यातील गटसचिवांनी दि. ५ जूनपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नवीन कर्ज मिळेल या आशेने कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोसायटीची बेबाकी मिळत नसल्याने कर्ज प्रकरणे रखडली आहेत. आधीच पावसाअभावी चिंतातुर असलेला शेतकरी बेबाकी मिळविण्यासाठी सोसायटीच्या चकरा मारून मेटाकुटीस आला आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवून देणाऱ्या बँक व राष्ट्रीयीकृत बँकांमधील दुवा म्हणजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या. या सोसायट्या प्रत्यक्ष कर्ज वाटत नसल्या तरी पीक कर्जाची संपूर्ण प्रक्रिया व शिफारस सोसायट्या करीत असतात. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता व्याजदरही अत्यंत अल्प लावला जात असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोसायट्यांमार्फत पीक कर्ज काढतात.
पीक कर्ज घेणे, फेडणे आणि पुन्हा घेणे या सालाबादप्रमाणेच्या प्रक्रियेला यंदा ब्रेक लागलेला आहे. सेवा सोसायट्यांचा कारभार पाहणाऱ्या गटसचिवांच्या काही मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून राज्यातील गटसचिव दि. ५ जूनपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज शेतकऱ्यांनी एप्रिल-मे महिन्यात भरून टाकलेले आहे. पुन्हा कर्ज घेण्यासाठी शेतकरी कर्ज प्रकरणाची जुळवाजुळव करीत असतानाच गटसचिव संपावर गेले. पीक कर्ज कोणत्याही बँकेचे घ्या; परंतु सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र आवश्यक आहे; परंतु गेल्या १५ दिवसांपासून बेबाकी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेतकरी सोसायटी कार्यालयाच्या चकरा मारीत आहेत. संपावर असलेले गटसचिव सोसायटीत येतच नसल्याने शेतकरी तसाच परत जात आहे. सचिवांनी जिल्हा निबंधक कार्यालयासमोर निदर्शने केली तेव्हा दि. २० जूनपर्यंत मागण्या मान्य होऊन काम सुरू होईल असे वाटत होते; परंतु त्यानंतरही संप सुरूच आहे.
आपल्याजवळ असलेले पैसे भरून टाकले. नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त आहे. संपकरी गटसचिव आणि शासन यांच्या भांडणात शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे अधिकार कुणाला तरी देऊन या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)