निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 07:09 PM2019-10-17T19:09:28+5:302019-10-17T19:10:31+5:30

नापिकी आणि कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या

Farmers commit suicide in the throes of elections; In 3 days in Soygaon, 3 farmers were committed suicide | निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

googlenewsNext

सोयगाव : सोयगावसह तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेने खरीप उत्पादक शेतकऱ्यांनी नापिकीची धास्ती घेतली आहे. यातच डोक्यावर कर्ज असल्याने आलेल्या नैराश्यातून तीन दिवसात तालुक्यातील ३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकरी आणि मजुरांनी हातांना काम नसल्याने स्थलांतर सुरु केले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारातून शेतकरी आत्महत्या या मुद्द्याच गायब झाल्याचे चित्र आहे.  

गुरुवारी पहाटे निंबायती येथील तरुण शेतकरी जगन सदू जाधव (३६  ) याने  पिकांची स्थिती पाहून आणि खासगी बँकांच्या वसुलीचा तगादा सहन न झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गेल्या चार दिवसापासून खासगी बँकेकडून त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावल्याचे त्याच्या मुलीने सांगितले. गुरुवारी शेतात गेल्यावर कपाशी पिकांची गंभीर स्थिती पाहून बँकेकडून घेतलेले पिककर्ज व खासगी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणामुळे पळसखेड येथील वैजिनाथ थोरात(३१) आणि पहुरी येथील २१ वर्षीय भगवान जाधव या दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. ऐन निवडणुका आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या धास्तीने तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निवडणुकांच्या कामाने पंचनामे रखडले
महिनाभरापासून तलाठी व महसूल विभाग निवडणुकांच्या कामांमध्ये गुंतला आहे. यामुळे तिन्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अहवाल पाठविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmers commit suicide in the throes of elections; In 3 days in Soygaon, 3 farmers were committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.