शेतकऱ्यानेच पेटवून दिला एक एकर ऊस
By Admin | Updated: December 29, 2014 00:56 IST2014-12-29T00:47:29+5:302014-12-29T00:56:55+5:30
लातूर : औसा तालुक्यातील हिप्परसोगा शिवारात गट नंबर १५१ मध्ये असलेल्या एक उसाला लवकर तोड मिळत नसल्याने ऊस वाळत होता. कारखान्याने तोड दिली

शेतकऱ्यानेच पेटवून दिला एक एकर ऊस
लातूर : औसा तालुक्यातील हिप्परसोगा शिवारात गट नंबर १५१ मध्ये असलेल्या एक उसाला लवकर तोड मिळत नसल्याने ऊस वाळत होता. कारखान्याने तोड दिली, मात्र ऊसतोड कामगारच तोडणीसाठी येत नसल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने रविवारी सकाळी आपल्या स्वत:च्या शेतातील एक एकर उसाच्या फडाला आग लावली.
पाणीटंचाई असल्याने वर्षभर सांभाळलेला ऊस आता वाळत आहे. पाणीच नसल्याने उसाची अवस्था दिवसेंदिवस चिपाडासारखी होत होती. कारखान्याने लवकर ऊस घेऊन जावा म्हणून गोंद्री येथील साईबाबा शुगर्सला खेटे घातले. कारखान्याने तोड दिली. मात्र लेबर तोडणीसाठी धजत नव्हते. कारखाना प्रशासनाकडे खेटे मारून कंटाळा आला म्हणून आपण स्वत:च ऊस पेटवून दिल्याचे शेतकरी शिवाजी गोविंद आळंदकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, बाजूलाही उसाचे फड आहे. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आणण्यात आली. दुपारी साई शुगर्सचे अधिकारी कोकाटे व भोईबार यांना भेटून ऊस जळाल्याची माहिती दिल्याचे आळंदकर म्हणाले. सोमवारी सदरील ऊस कारखान्याला घेऊन जाऊ, असे आश्वासन कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)