खोटी कमिटी सहन करणार नाही, फोन लावून चेक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:22+5:302021-07-18T04:04:22+5:30
औरंगाबाद : बोगसगिरी चालणार नाही. खोटी कमिटी सहन करणार नाही. खरीच नियुक्ती झाली का हे त्यातल्या पदाधिकाऱ्यांना फोन लावून ...

खोटी कमिटी सहन करणार नाही, फोन लावून चेक करणार
औरंगाबाद : बोगसगिरी चालणार नाही. खोटी कमिटी सहन करणार नाही. खरीच नियुक्ती झाली का हे त्यातल्या पदाधिकाऱ्यांना फोन लावून चेक करणार आहे. त्यामुळे मला दिलेल्या याद्या खऱ्या असतील तर ठीक आहे. अन्यथा आताच त्या परत घेऊन जा, असे खडे बोल येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी शनिवारी सुनावले.
शहागंजातील गांधी भवनात शनिवार दुपारपासून त्या मराठवाड्यातील महिला काँग्रेसचा जिल्हावार आढावा घेत होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, संघटनेत जीव ओता, मेहनत घ्या. तुमच्यातली ताकद ओळखा. तुमचे काय असेल तर तुम्हाला न्याय मिळणारच. दुसरीकडे न्याय मागण्याची गरज पडणार नाही
भाजपपेक्षाही काँग्रेस हाच पक्ष आहे, जो महिलांना प्राधान्य देतो, सन्मान देतो. जरा गांधी घराण्याचा त्याग आठवा. सोनिया गांधी यांचा त्याग आठवून पहा. परंतु, महिला कार्यकर्त्यांनी आता तक्रारी थांबविल्या पाहिजेत. मने दुखवणे थांबवायला पाहिजे. प्रोटोकॉलमध्ये फार अडकून पडता कामा नये. दुसऱ्यांना नावे ठेवून स्वतःला मोठे होता येत नसते.
प्रत्येक जिल्ह्याला एक वकील देणार, मेडिसिन बॅंक उभारणार या आपल्या आगामी उपक्रमाबद्दल सूतोवाच करीत सव्वालाखे यांनी स्वयंरोजगारातून संघटन उभे करता येते याबद्दलचा विश्वास दिला.
प्रत्येक महिलेला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा व काम करणाऱ्या कार्यकर्तीला समिती मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिले. मात्र, काम न करता कुणाचीही वशिलेबाजी सहन न करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी देऊन ठेवला.
सतत डावलले जात असल्याची कॉमन तक्रार...
जवळपास सर्वच जिल्ह्याच्या महिला पदाधिकाऱ्यांची कॉमन तक्रार ऐकू आली. आम्हाला डावलले जाते, प्रोटोकॉल पाळला जात नाही. स्टेजवर बसू दिले जात नाही. छाया मोडेकर यांनी तर घणाघाती भाषण केले. त्यावर उत्तर म्हणून प्रदेश उपाध्यक्षा संगीता धोंडे बोलल्या. प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे पाटील, उज्ज्वला दत्त, दीपाली मिसाळ, आदींनी काही सूचना केल्या.
महिला व युवक काँग्रेस मजबूत असेल तरच कुठल्याही निवडणुका जिंकणे सोपे असते याकडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी लक्ष वेधले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या सरोज नवपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सचिव मीनाक्षी बर्डे-देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विमल मापारी यांना काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश देण्यात आला. प्रेरणा खैरे व आणखी काही महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
हेमलता मुगदिया, प्रदेश सरचिटणीस सुनीता तायडे-निंबाळकर, जिल्हा अध्यक्षा सुरेखा पानकडे, आदींची मंचावर उपस्थिती होती.