आश्वासन ठरले फोल

By Admin | Updated: June 20, 2014 00:22 IST2014-06-20T00:22:11+5:302014-06-20T00:22:11+5:30

परभणी: अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील परिचारिकांनी १६ जून रोजी संपाचे हत्यार उपसले होते.

False assurance | आश्वासन ठरले फोल

आश्वासन ठरले फोल

परभणी: अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील परिचारिकांनी १६ जून रोजी संपाचे हत्यार उपसले होते. परंतु, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी संघटनेस आश्वासन देऊन बदल्यास स्थगिती दिली जाईल, असे सांगितले होते. परंतु, हे आश्वासन दोन दिवसही टिकले नाही आणि राज्यातील ६५ परिचारिकांच्या बदल्यांचे आदेश निघाले. त्यात परभणी सामान्य रुग्णालयातील २४ परिचारिकांचा समावेश आहे.
या बदल्यांमुळे पुन्हा एकदा परिचारिकांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे या बदल्या करताना जे काही शासकीय नियम आहेत, त्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या बदल्या जिल्हाअंतर्गत होऊ शकल्या असत्या. आहे त्याच रुग्णालयात विभागही बदलता आला असता परंतु, तसे न करता दूरवर बदल्यांचे आदेश निघाले आहेत. सेवेतील शेवटची पाच वर्षे आपल्या जिल्ह्यामध्ये असावित, असा नियम असतानाही अनेक जणांच्या बदल्या या अन्यत्र करण्यात आल्या आहेत. यापैकी काही जणी तर सेवानिवृत्तीकडे जात आहेत. परभणी सामान्य रुग्णालयातील एकूण २७ परिचारक, परिचारिकांच्या बदल्या झाल्यात. त्यात तीन बदल्या या विनंतीनुसार आहेत. या २७ जणांच्या बदल्यात केवळ चार जण परभणीत येत आहेत. परभणी सामान्य रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता आधीच परिचारिकांची संख्या कमी असताना या बदल्या झाल्यामुळे येथील व्यवस्थापन पूर्णत: कोलमडून जाणार आहे. येथील एका परिचारिकेच्या पतीचे सहा महिन्यापूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली. नियमानुसार त्यांच्या पत्नीची बदली अन्यत्र करता येत नाही. तरी देखील ती करण्यात आली. बदल्या करण्यात आलेल्या परिचारिका ह्या सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या असून त्यांच्या कामात निष्णात होत्या. शासनाच्या या धोरणाचा येथील परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा चंदाराणी लेमाडे, उपाध्यक्षा मीना देशमुख, सचिव विद्या महाडकर, कोषाध्यक्ष मेघा कोरटकर, सदस्य पडदुणे, महानंदा शेळके, राजर्षी ताजणे, लता डोंगरे, शोभा वाणी, चंद्रलेखा साळवे, मीरा सोनटक्के यांनी निषेध केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: False assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.