प्राध्यापकांच्या असहकाराचा विद्यापीठ प्राधिकरण मतदार यादींच्या छाननीला ब्रेक
By योगेश पायघन | Updated: August 17, 2022 18:58 IST2022-08-17T18:58:22+5:302022-08-17T18:58:39+5:30
पदवीधरांचे ३४ हजार ६४ अर्ज छाननीत ठरले वैध, इतर पाच गणांची अर्ज छाननी सुरू

प्राध्यापकांच्या असहकाराचा विद्यापीठ प्राधिकरण मतदार यादींच्या छाननीला ब्रेक
औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राधिकरण निवडणुकीच्या मतदार नोंदणीच्या छानणीस बुधवारी ब्रेक लागला. बामुटा या प्राध्यापक संघटनेने आम्ही फक्त शिकवणार प्रशासकीय कामात असहकार अशी भुमिका घेतल्याने बुधवारी प्राध्यापक छाननीच्या कामात सहभागी झाले नाहीत.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी मतदारांनी नाव नोंदणी अर्ज सादर केले एकूण ६० हजार मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू असून एकूण ५० प्राध्यपकांसह १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती छाननी प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. अध्यापक, प्राचार्य, विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांचे विभागप्रमुख आणि विद्यापीठ पदवीधर या सहा निर्वाचक गणांसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया राबविली गेली. ११ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीसाठी मुभा होती. त्या अर्जांच्या हार्ड काॅपीची छाननी सध्या सुरू आहे.
त्यापैकी पदवीधर निर्वाचक गणाची छानणी मंगळवारी पूर्ण झाली. तर इतर पाच गणांची छाननी अद्याप सुरू झालेली नाही. दुबार अर्ज काढणे, छाननी प्रक्रीया पुर्ण झाल्यावर डेटा फिडींगनंतर प्राथमिक यादी जाहीर होईल, त्यावर आक्षेप मागवून त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होईल. असे कुलसचिव डाॅ. जयश्री सुर्यवंशी म्हणाल्या.
आतापर्यंत ३४ हजार ६४ अर्ज वैध
सर्वाधिक मतदार नोंदणी झालेल्या पदवीधर मतदारांची अर्ज पडताळणी पूर्ण झाली आहे. पदवीधर मतदारांचे ३४ हजार ६४ अर्ज वैध ठरले आहेत. तर इतर पाच गणांच्या छाननीची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती कुलसचिव डाॅ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.