‘सर्वोपचार’वर अतिरिक्त ताण !
By Admin | Updated: July 6, 2014 23:58 IST2014-07-06T23:49:40+5:302014-07-06T23:58:42+5:30
लातूर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडला आहे़

‘सर्वोपचार’वर अतिरिक्त ताण !
लातूर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडला आहे़ उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज २०० च्या जवळपास वाढ झाली आहे़ परिणामी, काही प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयाचे नियमितचे नियोजनही कोलमडत असल्याचे दिसून येत आहे़
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे़ यात जिल्ह्यातील ९२ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत़ त्याचबरोबर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत असलेले ६० कंत्राटी डॉक्टरही शुक्रवारपासून या आंदोलनात सहभागी झाले आहेत़
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग्णांची तपासणी बंद झाली आहे़ त्याचबरोबर दोन उपजिल्हा रुग्णालयातील आणि दहा ग्रामीण रुग्णालयातील ४८ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले असल्याने तेथील तपासणीबरोबरच उपचारही थांबला आहे़ गेल्या आठवड्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया, सुरक्षित बाळंतपण, शवविच्छेदन झाले नाही़
रुग्णांना सुविधाच मिळत नसल्याने आर्थिक स्थिती चांगली असलेले नातेवाईक आपल्या रुग्णांस खाजगी दवाखान्यात घेऊन जात आहेत़ ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नाही ते मात्र शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा आधार घेत आहेत़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज दाखल होतात़ त्यामुळे येथे रुग्णांचा मेळाच भरलेला पाहावयास मिळतो़ दररोज ९०० च्या जवळपास नोंदणी होते़ परंतु, गेल्या मंगळवारपासून या नोंदणीत जवळपास २०० ने वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे़
‘सर्वोपचार’मध्ये १ जुलै रोजी १ हजार २२९, २ रोजी १ हजार १११, ३ रोजी १ हजार १२४, ४ जुलै रोजी १ हजार १७१ तर ५ जुलै रोजी १ हजार २१ अशी रुग्णांची नोंदणी होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत़ रुग्णांची संख्या वाढली असल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वॉर्ड रुग्णांनी हौसफुल्ल झाले आहेत़ या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या इमारतीत बसण्यासाठी जागा नसल्याने रुग्णालय परिसरात थांबत असल्याचे दिसून येत आहे़
अत्यावश्यक सेवा, जननी शिशुसुरक्षा कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात रुग्णवाहिका आहेत़ आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने या शासकीय रुग्णवाहिकांचा उपयोग रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी होत आहे़ त्यामुळे अनेकदा या रुग्णवाहिकेवरील चालकच ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांना सल्ला देत असल्याचे ऐकावयास मिळत आहे़ काही रुग्णवाहिकाचालकांना सुरुवातीस डॉक्टरांचा संप असल्याची माहिती नसल्याने ते थेट नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी घेऊन जात होते. डॉक्टर नसल्याचे समजताच पुन्हा तेथून खाजगी रुग्णालयाची वाट धरत होते. या धावपळीमुळे अतिरिक्त वेळ खर्च होत असल्याने नातेवाईकांची धास्ती वाढल्याचे दिसून येत होते. सध्या मात्र बिनधास्तपणे हे रुग्णवाहिका चालक खाजगी रुग्णालयांचा रस्ता दाखवीत आहेत. (प्रतिनिधी)
अत्यावश्यक सेवा रुग्णांत वाढ़़़
दररोजच्या ओपीडीबरोबरच अत्यावश्यक सेवेच्या रुग्णांत वाढ झाली आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात सेवा मिळत नसल्याने रुग्णांचा त्रास वाढत असल्याने त्यांना कोणत्याही वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे़
गरोदर मातांमध्ये लक्षणीय वाढ...
सुरक्षित बाळंतपण व्हावे, अशी अपेक्षा असली तरी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने गरोदर माता व त्यांचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडे धाव घेत आहेत़ त्यामुळे या संपाच्या कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयात नैसर्गिक बाळंतपण, सिझरचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे या बाळंत महिलांसाठी खाटांचा तुडवडा होत आहे़ ३० खाटांच्या वॉर्डात ७४ बाळंत महिलांना सेवा दिली जात आहे़ त्याचा ताण परिचारिकांवरही पडत आहे़
रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने काही प्रमाणात सेवाही विस्कळीत होत आहे़ रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या असून सेवा देण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ़ दीप्ती डोणगावकर यांनी सांगितले़